तहसिलदारांनी पाठलाग करुन पकडले अवैध वाळूचे ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 22:27 IST2019-11-14T22:27:21+5:302019-11-14T22:27:40+5:30
निमखेडीतील नदीपात्र : महसुल पथकासह पोलिसांची घेतली मदत

तहसिलदारांनी पाठलाग करुन पकडले अवैध वाळूचे ट्रॅक्टर
धुळे : तालुक्यातील निमखेडी येथील नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करताना सहा ट्रॅक्टर तहसीलदार किशोर कदम यांनी पकडले. या कारवाईमुळे वाळूची चोरटी वाहतूक करणाºयांना चांगलाच धसका भरला आहे.
तालुक्यातील निमखेडी येथे वाळूची चोरटी वाहतूक सुरु असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली होती. त्यानुसार तहसील खात्यातील अधिकारी व कर्मचाºयांना सोबत घेत सापळा रचत ही कारवाई केली. व ही कारवाई सुरू असतांना काही ट्रॅक्टर चालकांनी नदी शेजारील डोंगराळ जंगलातून ट्रॅक्टरसह पळ काढला. यादरम्यान तहसीलदार यांनी सोबत असलेल्या पथकास सोबत घेऊन त्यांचा फिल्मी स्टाईलने पळत पाठलाग केला. व काही ट्रॅक्टर जप्त केले. या सर्व ट्रॅक्टरांचा पंचनामा करण्यात आला.
यांनी केली कारवाई
तहसीलदार किशोर कदम, मंडळधिकारी सी़ यू़ पाटील, व्ही़ बी़ पाटील, आऱ डी़ देवरे, आऱ बी़ कुमावत, तलाठी दीपक महाजन, एम़ व्ही़ अहिरराव, डी़ पी़ ठाकरे, भोई, भैरट, महेंद्र पाटील , व्ही़ बी अहिरराव यांनी कारवाई केली़
पोलिसांसह पथकही तैनात
या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. तसेच जास्तीत जास्त अवैध वाळू वाहतूक करणाºयांवर कारवाई करता यावी याकरिता तहसील कार्यालयाच्यावतीने पथक तयार करण्यात आले होते.
चोरी थांबविण्याची गरज
नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात होणारी वाळूची चोरी वेळीच थांबविण्याची आवश्यकता आहे़ जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांनी याकडे स्वत: लक्ष देवून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलायला हवी़
हे ट्रॅक्टर केले जप्त
या कारवाईत विजय पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर एमएच १८ एन ८५२६, नरेंद्र कुलकर्णी यांचे दोन ट्रॅक्टर एमएच १८ - ७७३३ आणि एमएच १८ - ७६१९, युवराज खताळ यांचे दोन ट्रॅक्टर एमएच १८ झेड ३४६ आणि २९२५, देवराम माळी एमएच १८ - झेड - ७३८८, तसेच राजेंद्र मालजी पाटील यांच्या मालिकेचे मुरुमने भरलेला एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला़
तहसिलदारांनी चालविले स्वत: ट्रॅक्टर
ही कारवाई सुरु असतांना नदीतील खोºयांमध्ये काही ट्रॅक्टर लपवून चालकांनी पळ काढला होता. परंतु चार ते पाच किमी अंतरावर हे ट्रॅक्टर लपविण्यात आले असल्याने या वाहनांना चालविण्यासाठी चालक उपलब्ध होत नव्हते. यावेळी तहसीलदार कदम यांनी स्वत:च ट्रॅक्टर चालवत नदीतून बाहेर काढून आणले व पंचनामा केला. यावेळी गावातील व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.