तलवार काढणे धुळ्यात फॅशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:48+5:302021-07-18T04:25:48+5:30

अशा घटनेतील संशयित हा पकडला गेला की काही दिवसांनी जामिनावर सुटतो. मग ‘तो’ तरुण हा त्या भागातील ...

Sword drawing fashion in the wash | तलवार काढणे धुळ्यात फॅशन

तलवार काढणे धुळ्यात फॅशन

अशा घटनेतील संशयित हा पकडला गेला की काही दिवसांनी जामिनावर सुटतो. मग ‘तो’ तरुण हा त्या भागातील रजिस्टर दादा बनतो. त्याच्यामागे लगेच तरुणांची गर्दी जमते. मग त्याला लगेच कोणाचा तरी ‘वरदहस्त’ लाभतो. त्याला मोटारसायकल फिरविण्यासाठी पेट्रोल आणि अन्य खर्च करण्यासाठी फायनान्सर शोधावा लागत नाही. तो आपोआप त्याच्याकडे येतो. आणि मग सुरू होते, त्या दादाची नवीन लाइफ. त्याला पाहून सर्वसामान्य नागरिक अरे याने तलवार चालविली होती. म्हणून घाबरून नमस्कार करतात. हळूहळू पांढरेशुभ्र कडक इस्तरीचे कपडे घालून दिवसभर दहा-पाच तरुणांना घेऊन इकडे तिकडे फिरतो. दोन-पाच वर्षांनी हा गुंड ‘व्हाइट कॉलर’ नेता बनतो, नगरसेवक बनतो. अशा गोष्टी करणारे गुंड धुळ्यातील महाविद्यालयीन तरुणांचे ‘हिरो’ बनले आहेत. अशा तरुणांचा राजकीय क्षेत्रातील मोठ्या नेत्यांमधील बसणे उठणे, पोलिसांकडून मिळणारा मानमरातब पाहून महाविद्यालयीन तरुण हुरळून जातात. मग हेच त्यांच्यासाठी आदर्श बनतात. त्यांच्या मागेपुढे फिरतात, त्यांची बडदास्त ठेवतात. त्यांना त्यांच्या ‘गँग’मधला म्हणवून घेण्यात हे तरुण स्वत:ला धन्य समजतात. मग अशा तरुणांच्या बसण्या, उठण्यात, बोलण्यात आणि चालण्यात एक वेगळी ‘रग’ निर्माण होते. चौकात मोटारसायकली लावून बसलेल्या अशा तरुणांकडे मग कोणी रागाने बघणे तर दूर, त्या चौकातील कोणी दुकानदार त्यांना चुकून गाडी बाजूला लावून उभे राहा, असे बोलण्याची हिम्मतही करणार नाही. तसे केले तर मग विचारच करून ठेवा, मग काही होऊ शकते. यातूनच मग कट मारला, रागाने पाहिले म्हणून सहज धारदार शस्त्राने वार करून मारहाण करण्याच्या घटना घडतात. मारहाणीत मग खूनही होतो. शहरात हा जो ‘ट्रेंड’ सुरू झाला आहे, तो समाजासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक ठरणारा आहे. याला कारणीभूत सर्वच घटक आहे. पोलीस, राजकीय आणि काही अंशी नागरिकसुद्धा आहेत. कारण अशा गुंडांना या सर्वांच्या मूकसंमतीने प्रोत्साहन मिळत असते. असे लोक मग राजकारणातही येतात. नेते होतात, मोठी पदे भूषवितात.

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहराचा औद्योगिक विकास होणेही गरजेचे आहे. जर शहरातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग सुरू झाले तर त्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, आणि शिकल्यानंतर चौकात कट्ट्यावर टवाळकी करण्यात वेळ घालवण्याऐवजी नोकरीला लागेल. पण शहराचा किंवा जिल्ह्याचा औद्योगिक विकास तसा पाहिला तर ‘झिरो’ आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील हुशार व शिकलेला तरुण हा नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबईला जाऊन स्थायिक होतो. आणि जो मध्यमवर्गीय शिकलेला तरुण असतो तो पुणे, मुंबईला मिळणाऱ्या जॉबमध्ये भागणार नाही, म्हणून धुळ्यातच थांबतो आणि चुकीच्या मार्गाला लागतो. तसे होऊ नये यासाठी शहरासह जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत. शहराच्या विकासासाठी रस्ते, पाणी आणि अन्य नागरी सुविधा तर हव्याच. पण सोबतच औद्योगिक विकासही आवश्यक आहे. तरच शहराचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी राजकारण सोडून शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा तरुणांमध्ये निर्माण होणारी अशा गुंडांची क्रेझ कमी होण्याऐवजी वाढतच राहणार आहे. त्यामुळे शहरातील गुंडगिरी आणि गुन्हेगारी ही कमी होण्याऐवजी वाढतच जाणार आहे.

Web Title: Sword drawing fashion in the wash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.