धुळे :तालुक्यातील शिरुड येथे वाळुची वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविल्याचा राग आल्याने तलाठ्यास शिवीगाळ करण्यात आल्याची घटना १ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी चौघांविरूद्ध धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.धुळे तालुक्यातील शिरुड बाजारपेठेत वाळू भरुन एक ट्रॅक्टर जात असल्याचे तलाठी संदिप गवळी यांना दिसले़ तलाठी गवळी यांनी ट्रॅक्टर थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात वाळू आढळून आली. ट्रॅक्टर थांबविल्याने व चौकशी केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. ट्रॅक्टर चौकशीसाठी तहसील कार्यालयात आणण्याचे तलाठ्याने सांगताच संशयितांनी आरडाओरड केली. तसेच हे ट्रॅक्टर आम्ही तहसील कचेरीत घेऊन जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली़ तुम्हाला आणि तुमच्या अधिकाऱ्यांना पाहून घेवू अशी दमबाजीही केली़ यानंतर संशयितांनी ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर खाली कर आणि पळून जा असे सांगत शासकीय कामात अडथळा आणला़ एवढ्यावर संशयित न थांबता तलाठ्याच्या अंगावर धावून गेले. तसेच कोतवाल नागो देवचंद कोळी यांना धक्काबुक्की केली़अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडल्यानंतर झालेली शिवीगाळ आणि दमदाटीनंतर तलाठी संदिप सुभाष गवळी (रा़ गोंदूर रोड, वलवाडी, धुळे) यांनी तालुका पोलीस ठाण्यात रविवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, रोहन किरणसिंग पाटील, आनंदसिंग नामदेव देशमुख (दोन्ही रा़ कुंझर ता़ पारोळा जि़ जळगाव), भरत फकिरा शिंदे (रा़ शिरुड ता़ धुळे) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़ गुन्हा दाखल होताच भरत शिंदे याला पोलिसांनी गावात जावून अटक केली आहे़
वाळुचे ट्रॅक्टर पकडणाऱ्या तलाठ्यास शिवीगाळ, दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 21:51 IST