कापडणे येथे रेशन तांदळाचा संशयित ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:25 IST2021-06-26T04:25:04+5:302021-06-26T04:25:04+5:30
न्याहळोद : परिसरातील कापडणे येथे गाव दरवाज्याजवळ संशयास्पद ट्रक उभा होता. चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीवरून धुळे स्थानिक ...

कापडणे येथे रेशन तांदळाचा संशयित ट्रक पकडला
न्याहळोद : परिसरातील कापडणे येथे गाव दरवाज्याजवळ संशयास्पद ट्रक उभा होता. चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीवरून धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तांदळाचा ट्रक ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी सोनगीर पोलीस ठाण्यात जमा केला आहे.
गुरुवारी (दि. २४) दुपारपासून बाजारपेठेशेजारी ट्रक (एमएच १८ बीजी ७७५३) उभा होता. यात खत असल्याचे चालक सांगत होता. मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी कुणीही खत मागवले नव्हते. तसेच मालकाचा फोन आल्यावर कुठे जायचे ते समजेल असे सांगितल्याने अधिकच संशय वाढला. त्यात तांदूळ असल्याची खात्री झाल्याने ग्रामस्थांनी महसूल, पोलीस प्रशासनास माहिती दिली. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सायंकाळी ७ वाजता संशयित ट्रकची चौकशी केली. यावेळी मोठी गर्दी झाली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ट्रक ताब्यात घेऊन रात्री सोनगीर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. यातील तांदळाचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, परिसरात तांदूळ पीक घेतले जात नाही. दुकानदाराचादेखील नव्हता तसेच चालक तांदूळऐवजी खत असल्याचे सांगत असल्याने हा तांदूळ काळ्या बाजारातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.