लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपूर भागात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात एका १९ वर्षाच्या तरुणाचा पोहताना संशयास्पद मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी ७ ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ व्यंकटेश नितीन सातभाई असे तरुणाचे नाव असून तो जुने धुळे भागात राहतो़ गेल्या चार दिवसांपासून तो पोहण्यासाठी या ठिकाणी येत होता़ श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेत तो बारावीचे शिक्षण घेत होता़ त्याचे वडील जळगाव जनता बँकेत नोकरीला आहेत़ नेहमी प्रमाणे तो सकाळी जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता़ यावेळी अनेक जण पोहत होते़ तो पाण्यात असताना त्याचा मृत्यू ओढवला़ घटना लक्षात येताच तिथे उपस्थित असलेले प्रशिक्षक यांनी त्याला पाण्याच्या बाहेर काढले़ त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला़ पण, यश आले नाही़ वयाच्या मानाने त्याचे वजन जास्त असल्याने ते कमी करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला पोहण्याचा क्लास लावला होता, असे सांगण्यात आले़ त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे़ त्याचा अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचा उलगडा होणार आहे़ त्याच्या दुर्देवी मृत्यूमुळे तो राहत असलेल्या जुने धुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़
धुळ्यातील जलतरण तलावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 11:55 IST