धुळ्यात स्वत: गळ्यावर ब्लेड मारुन घेत संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:10 IST2020-07-17T22:09:34+5:302020-07-17T22:10:16+5:30
पोलिसांच्या वाहनातील प्रकार : गोवंश चोरी प्रकरण

धुळ्यात स्वत: गळ्यावर ब्लेड मारुन घेत संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न
धुळे : पोलिसांनी गोवंश चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने पोलिसांच्या वाहनात स्वत:च्या मानेवर ब्लेडने मारुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला़ याप्रकरणी गुरुवारी पहाटे मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़
मुज्जमील हुसेन मोहम्मद इस्त्राइल अन्सारी (२९, काझी प्लॉट, वडजाई रोड, धुळे) या संशयिताला गोवंश चोरी प्रकरणात मोहाडी पोलिसांनी १५ जुलै रोजी चौकशीकामी ताब्यात घेतले होते़ त्याला अटक करण्यापुर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला एमएच १८ एफ ०१५१ या पोलिसांच्या वाहनातून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले़ रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याला परत घेऊन जात असताना मुज्जमील अन्सारी याने रुग्णालयातून जुने वापरलेले सर्जिकल ब्लेड उचलून घेतले होते़ पोलिसांचे वाहन त्याला घेऊन मुंबई आग्रा महामार्गावरुन घेऊन जात असताना अपना हॉटेलजवळ अन्सारीने लपवून आणलेल्या ब्लेडने स्वत:च्या मानेवर मारुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़
घटनेचे गांभिर्य ओळखून वाहनात असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ अडविले़ स्वत:ला दुखापत करुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून मुज्जमील अन्सारी याच्या विरोधात गुरुवारी पहाटे सव्वा बारा वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी भूरा इंदा पाटील यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३०९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़