सूरत-नागपूर महामार्गाचा भराव पहिल्याच पावसात खचला; नेर बायपासजवळ शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:39+5:302021-07-16T04:25:39+5:30
सूरत-नागपूर महामार्ग नेर येथून बायपास जात असून, यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. परंतु, महामार्ग तयार करणाऱ्या संबंधित ...

सूरत-नागपूर महामार्गाचा भराव पहिल्याच पावसात खचला; नेर बायपासजवळ शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान
सूरत-नागपूर महामार्ग नेर येथून बायपास जात असून, यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. परंतु, महामार्ग तयार करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट केल्याचे पावसानंतर उघड झाले आहे. नेर येथील महाल रायवट आणि महालकाळी या शिवारातून जाणाऱ्या या महार्गावरील अनेक शेतकऱ्यांना या निकृष्ट कामाचा फटका बसला आहे.
महामार्गाचे चौपदीकरण करताना सर्व्हिस रोड करण्यात आलेला नाही, तर ठेकेदाराने महामार्गाच्या बाजूला माती टाकून भराव केला आहे. परंतु, हा भराव करताना ते व्यवस्थित दाबलेला नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यात हा भरावही वाहून गेला आहे. तसेच नेर येथील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्ग चौपदकरीकरणाच्या पलीकडे असल्याने त्यांना शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्ताही करून दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी माल नेण्यासाठी आणि शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा बैलगाडी उलटून अपघातही होत आहे. या समस्या संबंधित ठेकेदाराला सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
महामार्गाचे काम निकृष्ट केल्याने भराव वाहून गेला आहे. तसेच आउटलेटचे पाणीही तुंबून ते शेतात जात आहे. यामुळे शेताचे आणि महामार्गाचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी सर्व्हिस रोड तयार केला असता तर शेतकऱ्यांची समस्या दूर झाली असती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ही समस्या न सुटल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. - योगेश गवळे, शेतकरी, नेर
पिके सडू लागली
महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्गावर आऊटलेट टाकण्यात आले आहे. परंतु, तेही टाकताना निष्काळजीपणा केल्याने पाण्याचा निचरा न होता ते तुंबून राहिल्याने मध्येच हा महामार्ग खचला आहे. यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच हे पाणी महामार्गाला लागून असलेल्या शेतांमध्ये शिरले आहे. उभ्या पिकात हे भराव केलेल्या रस्त्याचे खारट पाणी शिरल्याने पिके सडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.