गळफास घेऊन आत्महत्या; पिंपळनेर आणि निमडाळे येथील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: March 31, 2023 17:03 IST2023-03-31T17:03:06+5:302023-03-31T17:03:28+5:30
तरुणाच्या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.

गळफास घेऊन आत्महत्या; पिंपळनेर आणि निमडाळे येथील घटना
धुळे : तालुक्यातील निमडाळे आणि साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.
निमडाळे येथील घटना
धुळे तालुक्यातील निमडाळे येथील सागर वासुदेव सूर्यवंशी (पाटील) (वय २६) या तरुणाचे शेत आहे. या शेतात असलेल्या एका निंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करुन घेतली. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्याला खाली उतरून खासगी वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास डॉ. रिना साहू यांनी मयत घोषीत केले. पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पिंपळनेर येथील घटना
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोहर दगा सोनवणे (वय २५, रा. अग्रवालनगर, गजानन कॉलनी, पिंपळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घराच्या छताच्या लोखंडी कडीला स्कार्फने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यावर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.