यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध परिश्रमाची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST2021-07-28T04:37:27+5:302021-07-28T04:37:27+5:30
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावअंतर्गत रसायनशास्त्र प्रशाळा विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नेट/सेटच्या ...

यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध परिश्रमाची आवश्यकता
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावअंतर्गत रसायनशास्त्र प्रशाळा विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नेट/सेटच्या तयारीसाठी लागणारे मार्गदर्शनपर ‘प्रॅक्टिसिंग नेट-सेट एक्झामिनेशन इन केमिकल सायन्सेस’ या विषयाची सातदिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळा झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राशिनकर बोलत होते.
डॉ. राशिनकर यांनी यावेळी नेट/सेट परीक्षा पद्धती, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळेचे नियोजन व स्टडी मटेरियल याविषयी माहिती देताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेट-सेट परीक्षा देण्याआधी अभ्यासक्रम, परीक्षापद्धती, तसेच सर्व विषयांचा नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केल्यास परीक्षा पास होणे सहज शक्य आहे. परीक्षेच्या अगोदर जास्तीत जास्त मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे असून, परीक्षा देताना आपला दृष्टिकोन हा सकारात्मक आणि उत्साही असला पाहिजे.
माजी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी.पी. माहुलीकर म्हणाले, महिलांचे प्रत्येक क्षेत्रात सहभागी व यशस्वी होण्याचे प्रमाण वाढत असून, महिलांना प्रोत्साहन देणे व पायाभूत ज्ञान देणे काळाची गरज आहे.
प्रा. डॉ.आर.एस. पाटील, डॉ. नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेत महाराष्ट्रातील १२ व देशभरातील इतर २१ विद्यापीठांतून एकूण १०२८ जण सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.एम. के.पटेल यांनी केले. यशस्वीतेसाठी माजी प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, एसीटीचे उपाध्यक्ष प्रा.ए.एम.नेमाडे, सचिव डॉ.गुणवंत सोनवणे, प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.पी.एस. गिरासे आदींनी परिश्रम घेतले.