यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:28+5:302021-09-17T04:42:28+5:30
धुळे : सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या मृगजळासारख्या आहेत; पण त्यातील यश सत्यात उतरविणे ही बाब अशक्यप्राय नाही. कठोर ...

यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक
धुळे :
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या मृगजळासारख्या आहेत; पण त्यातील यश सत्यात उतरविणे ही बाब अशक्यप्राय नाही. कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास याला कोणताही पर्याय नाही ही बाब समजून प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणे शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयातील सनदी अधिकारी प्रांजल पाटील यांनी केले. त्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
जिल्हा प्रशासन कार्यालय वर्धा, विद्यावर्धिनी महाविद्यालयाची गुणवत्ता सुधार समिती, दिव्यांग विभाग आणि ग्रंथालय विभाग यांनी संयुक्तपणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केल होते. या कार्यशाळेला धुळे, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद, नाशिक व वर्धा, आदी जिल्ह्यातील दिव्यांग व इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अध्यक्षस्थनी विद्यावर्धिनी गव्हनिंग कौन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेड होते. याप्रसंगी वर्धा येथील नीतेश कराळे, प्राचार्य डॉ. पुष्पा गावित उपप्राचार्य प्रा. खलील अन्सारी उपस्थिती होते.
ग्रामीण भागातील, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोर जाताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांनी स्वतः स्वावलंबी होऊन या अडचणींवर मात करावी. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आज इंटरनेटवर अनेक प्रकारची सॉफ्टवेअर्स व उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. या ऑनलाईन साफ्टवेअर्समध्ये त्यांनी पारंगत होण्याचा प्रयत्न करावा. अपयशाची चिंता न करता प्रत्येक स्पर्धा परीक्षेला सामोरे जा असे आवाहनही प्रांजल पाटील यांनी केले. जीवनातील प्रत्येक आव्हान व अडचणींचा सामना करण्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासालाच आधार बनवावे, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आत्मविश्वास हेच सर्वांत मोठे साधन किंवा शस्त्र आहे. त्याच्या आधारेच आपण यशस्वी होऊ शकतो, असे मत अक्षय छाजेड यांनी व्यक्त केले. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रश्न - उत्तराचे विशेष सत्रही आयोजित करण्यात आले होते. त्याचे संयोजन डॉ. योगेश पाटील व कराळे यांनी केले. यावेळी सुवर्णा पाटील, सचिन भदाणे, किशोर जराड, विनय वाघ व कोमल पाटील यांच्यासह इतर जिल्ह्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. त्यावर प्रांजल पाटील यांनी समर्पक उत्तरे दिली. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले. दिव्यांग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस. जी. गोल्डे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. वाय. जी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय पालवे यांनी परिचय करून दिला. ग्रंथपाल वाय. एन. पाटील यांनी आभार मानले.