सेवाभावी वृत्तीमुळेच कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:24+5:302021-02-06T05:07:24+5:30
धुळे महानगरपालिकेतर्फे आयोजित कोरोना योद्धा सन्मान समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर चंद्रकांत सोनार, माजी केंद्रीय राज्यमंत्री ...

सेवाभावी वृत्तीमुळेच कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश
धुळे महानगरपालिकेतर्फे आयोजित कोरोना योद्धा सन्मान समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर चंद्रकांत सोनार, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे, धुळे शहराचे आमदार डॉ. फारुक शाह. माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, सेवा हाच धर्म हे आपल्या देशाचे वैशिष्ट आहे. याच समर्पित भावनेतून अनेकांनी आपापल्यापरीने कामगिरी बजावली. ते सर्वच जण कौतुकास पात्र आहेत.
करूणा, दया आणि सहानुभूती हे गुणही आपल्या अंगी आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळात अनेकजण एकमेकांच्या मदतीसाठी धावून आले. किंबहुना इतरांची मदत करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्यच असल्याचे त्यांनी सांगितले.
समाज आहे तर आपण आहोत, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन विकास केला पाहिजे. काम करतांना फक्त देशाचाच विचार झाला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. धुळ्याचा विकास झाला तर देशाचाही विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.
सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा संदेश कोरोनाने दिला आहे. कोरोनाचे भय अजूनही संपलेले नाही. त्यामुळे आपण सदैव जागृत राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार रावल म्हणाले, अनेकवर्षे धुळे जिल्हा मागासलेला म्हणून ओळखला जायचा. मात्र आता रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात तसेच लसीकरणातही धुळे जिल्हा राज्यात प्रथम आहे. अनेक प्रगत देशांना अजूनही कोरोनाशी लढा कसा द्यायचा हे समजत नाही, मात्र भारताने केवळ यशस्वी लढाच दिला नाही, तर या महामारीवर उपाय म्हणून लसही शोधून काढली. कोरानाकाळात कोरोना योद्धांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार डॅा. सुभाष भामरे म्हणाले, या महामारीमुळे अनेकांचे मृत्यू होऊ लागल्याने लोक प्रचंड घाबरलेले हाेते. एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला हात लावण्याची हिंमतही कोणाची होत नव्हती. मात्र अशा भयानक स्थितीत डॅाक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यासह अनेक क्षेत्रातील लोकांनी मदतकार्य करून माणुसकी अजूनही कायम आहे हे दाखवून दिले. अशा संकटकाळी सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक जाणीव ठेवत आपला सेवेचा वसा सोडला नाही. कोरोना योद्धांची ही कामगिरी समाजासाठी प्रेरणादायी असून ती अनेकांना समाजकार्य करण्यास प्रवृत्त करेल.
प्रास्ताविक महापौर यांनी केले. ते म्हणाले कोरोना योद्धांच्या कामगिरीमुळेच शहरात या संसर्गाला अटकाव करू शकलो.
यांचा झाला कोरोना योद्धा म्हणून सत्कार
महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, शिरपूरचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी यांच्या पत्नी संगीता माळी, अग्रवाल भवनचे अध्यक्ष विनोद मित्तल, डॉ. चुडामण पाटील यांचे वडील पुंडलिक पाटील, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, दीपकांत वाघ, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. मृदुला द्रविड, डॉ. दीपक शेजवळ, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल, प्रवीण पवार, हाजी शवाल अन्सारी, अमिन पटेल, दोंडाईचा नगरपालिकेच्या आरोग्य सभापती मनीषा गिरासे, चेतन सिसोदिया, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. निर्मलकुमार रौंदळे, डॉ. मुकरम खान, डॉ. जिनेंद्र जैन, शोभाबाई मोरे, आकाश कांबळे, सचिन शेवतकर, विजय पवार, अनिल वानखेडे, अबू मसूद अन्सारी यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला.