धुळे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे येथे रुग्ण कल्याण समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीत अशासकीय सदस्य व स्वयंसेवी संस्थांचा समावेश असणार आहे. त्यासाठी पात्र सदस्य व स्वयंसेवी संस्थांनी सात दिवसांच्या आत संपूर्ण माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळात जिल्हाधिकारी यादव हे अध्यक्ष असतील. याशिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. सह अध्यक्ष, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेले दोन ख्यातनाम नागरिक, जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेली अशासकीय संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेले आरोग्य सेवेतील अशासकीय संस्था, सार्वजनिक विभागातील प्रतिनिधी, देणगी देणाऱ्या व्यक्ती व संस्था (रुपये ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त) हे सदस्य असतील. जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव असतील.
इच्छुकांनी आधारकार्ड, दोन रंगीत छायाचित्र, ई - मेल आयडी, मोबाईल क्रमांक, संस्थेचे प्रोसिडिंग बुक, १०० रुपयांच्या मुद्रांकावरील प्रतिज्ञापत्र, ११० रुपयांचे न्यायालयीन मुद्रांक शुल्क तिकीट, जागेबाबतचा पुरावा, सर्व सभासदांच्या जन्मतारखेचे दाखले, संस्थेचा मागील तीन वर्षांचा लेखा परीक्षण अहवाल, संस्थेचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील प्रमाणपत्र, संस्थेचे पॅनकार्ड आदी कागदपत्रे जोडावीत.