जुलैपासून मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:55 IST2020-06-20T11:54:41+5:302020-06-20T11:55:50+5:30

जिल्हा परिषद : धुळे जिल्हयातील पावणे तीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ, शाळा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत घरपोच मिळणार धान्य

Students will get nutritious food from July | जुलैपासून मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शाळा सुरू करण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी येत्या जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळ देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
दरवर्षी जून महिन्याच्या १५ अथवा १६ तारखेला शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिजवून शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. येत्या जुलैपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे आदेश असले तरी राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, शाळा कधी सुरू होतील याची अद्यापही शाश्वती नाही. परंतु शिक्षण विभागाने टप्या-टप्याने शाळा सुरू करण्यासाठी कृती आरखडा तयार केला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा सुरू होण्याची तारीख अद्यापही निश्चित नसली तरी विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचीत राहू नये यासाठी येत्या जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यात आॅगस्ट महिन्यापासून सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होण्याची शक्यता असली तरी इयता पहिली ते आठवीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्याचबरोबर खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जुलैपासूनच घरपोच तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकूण १६७७ शाळा असून, २ लाख ७२ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शालेय पोषण आहार अधीक्षक आर.एच. तडवी यांनी दिली. जुलैपासून पोषण आहार मिळणार असल्याने, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

Web Title: Students will get nutritious food from July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे