तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत मिळाला प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:20+5:302021-02-05T08:47:20+5:30
दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कोराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, पहिल्या टप्यात ९ वी ते१२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती. ...

तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत मिळाला प्रवेश
दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कोराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, पहिल्या टप्यात ९ वी ते१२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून माध्यमिकच्या शाळा सुरुवातीला ग्रामीण भागात नंतर शहरी भागात सुरू झाल्या.
आता दुसऱ्या टप्यात शहरी व ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी एकाचवेळी म्हणजे २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्याप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणीही करण्यात आली. शाळा सुरू होणार असल्याने, शाळांनीही अगोदरच तयारी करून ठेवलेली होती. शाळा परिसर, वर्ग खोल्या स्वच्छ केलेल्या होत्या. एका वर्गात फक्त ५० टक्केच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे आदेश आहेत.
दरम्यान, शाळा सुरू होणार असल्याने, प्राथमिकच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. कडाक्याची थंडी असतानाही सकाळी ७ वाजेपूर्वी काही ठिकाणी विद्यार्थी शाळेच्या आवारात हजर झालेले होते. शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे थर्मल गन हातावर लावून तापमान मोजण्यात आले. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ॲाक्सिमीटरने ॲाक्सिजनचे प्रमाण मोजण्यात आले. एकाही विद्यार्थी-विद्यार्थिनीला कोरोनाची लक्षणे दिसून न आल्याने, शिक्षकांनीही सुटकेचा श्वास सोडला.
अगोदरच शाळा उशिरा सुरू झालेल्या आहेत. तसेच द्वितीय सत्राचा कालावधीही कमी असल्याने, धुळ्यातील अनेक शाळांनी पहिल्या दिवसापासूनच शिकविण्यास सुरूवात केली. तर ग्रामीण भागात मात्र पहिल्या दिवशी ॲानलाईन अभ्यासक्रमाचा आढावा घेण्यात आला. पहिला दिवशी फक्त चार तासिका घेण्यात आल्या.
दरम्यान, दीर्घ कालावधीनंतर मित्र-मैत्रिणी भेटल्याने विद्यार्थ्यांनाही आनंद झालेला होता. तर गेल्या नऊ महिन्यांपासून विद्यार्थ्यांअभावी सुनासुना झालेला शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेला होता.