संस्थेच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 22:06 IST2020-12-03T22:06:01+5:302020-12-03T22:06:21+5:30
धुळे : संस्थेने पात्र नसलेल्या डाॅक्टरची नियुक्ती करुन केलेला हलगर्जीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोरोण ता. धुळे येथील मतिमंद विद्यालयातील ...

dhule
धुळे : संस्थेने पात्र नसलेल्या डाॅक्टरची नियुक्ती करुन केलेला हलगर्जीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोरोण ता. धुळे येथील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत अतीशय धक्कादायक चाैकशी अहवाल त्रयस्त समितीने समाजकल्याण आयुक्तालयाला सादर केला आहे.
मोरोण उपनगरातील सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलीत तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालयात १८ जुलै २०१९ रोजी रोहित पवार या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यु झाला. रोहितच्या पालकांनी चाैकशीची मागणी लावून धरली. त्यांच्या मागणी नंतर समाजकल्याण विभागाने चौकशी देखील केली. मात्र ही चौकशी एकतर्फी असल्यामुळे पालकांनी समाजकल्याण आयुक्तांकडे दाद मागीतली होती.
समाजकल्याण आयुक्तांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीन सदस्यीय त्रयस्थ चौकशी समिती नियुक्त केली होती. या चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणुन डॉ. आर. व्ही. पाटील तर सदस्य म्हणुन अनिता रणदिवे, संजय सोनवणे यांनी काम पाहिले. चौकशी समितीने प्रत्यक्ष शाळेत जाऊन तसेच प्रत्यक्ष साक्षीदार रोहितवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारीका, पालक यांचे जबाब नोंदविले. चौकशी समितीने संस्थेच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
चौकशी समितीने केलेल्या चौकशीअंती रोहितला १७ जुलै २०१९ रोजी ताप व खोकला होता हे परिचारीका ज्योत्स्ना पाटील आणि डॉ. रमेश बोरसे यांनी नमुद केले आहे. यामुळे रोहितला तत्काळ उपचाराची गरज असतांना दुर्लक्ष करण्यात आले. या शिवाय शाळेचे कर्मचाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केले आहे. शाळेचे सीसीटिव्ही कॅमेरे नेमके त्या दिवशी बंद होते. रात्रपाळीला दोन काळजी वाहकांपैकी कोणीच हजर नव्हते. या गलथान कारभारामुळे रोहितचा नाहक बळी गेला. त्यामुळे या प्रकरणात परिचारीका ज्योत्स्ना पाटील, डॉ. रमेश बोरसे, मुख्याध्यापीका मंदा इंगळे, अधिक्षक संदिप बडगुजर, काळजीवाहक श्याम पाटील, हेमंत गांगुर्डे यांनी कर्तव्यात कसुर केल्याचे समितीने नमुद केले आहे. चौकशी अहवाल समाजकल्याण आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. त्या नंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.