कोविड काळात ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा : प्रा. डाॅ. जालिंदर अडसुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST2021-07-28T04:37:18+5:302021-07-28T04:37:18+5:30
धुळे : काेविडच्या कठीण काळात सर्वाधिक परिणाम शिक्षणावर झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने निरंतर सुरू आहे. परंतु ...

कोविड काळात ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा : प्रा. डाॅ. जालिंदर अडसुळे
धुळे : काेविडच्या कठीण काळात सर्वाधिक परिणाम शिक्षणावर झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने निरंतर सुरू आहे. परंतु ग्रामीण भागातील मुलांना नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. असे असले तरी नव्या तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन शिक्षण समजून घेताना विद्यार्थ्यांना फायदा होत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. जालिंदर अडसुळे यांनी केले. मोराणे, ता. धुळे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय व युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज (यूपीईएस) देहरादून यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड परिस्थितीत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेला परिणाम या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डाॅ. जालिंदर अडसुळे यांनी कोविडकाळातील पदव्युत्तर शिक्षणाचा सर्वंकष आढावा घेतला. या कालावधीत कोणत्या शैक्षणिक आव्हानांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला यावर मार्गदर्शन केले. तसेच निरंतर शिक्षण सुरू राहण्यासाठी कोणत्या बाबी केल्या पाहिजेत यावर अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदविले.
या वेबिनारमध्ये दिल्ली विद्यापीठातील समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. संजय भट्ट, जेएनयू नवी दिल्ली येथील प्रा. डाॅ. शरद बाविस्कर, यूपीईएस देहरादून येथील करियर सर्व्हिस विभागाच्या अध्यक्ष शिवानी यादव आदींनी सहभाग घेतला.
काेविडकाळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर झालेला परिणाम यावर आपली अभ्यासपूर्ण मते नोंदवली. वेबिनारमध्ये देशभरातील २००हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. वेबिनारचे सल्लागार म्हणून समता शिक्षण संस्था पुणेच्या अध्यक्षा प्रा. उषा वाघ, प्रा. रचना अडसुळे, यूपीईएसचे सहायक व्यवस्थापक ऋषिकेश अग्रवाल यांनी काम पाहिले. वेबिनारच्या समन्वयक प्रा. डाॅ. फरिदा खान होत्या. यूपीईएसचे विद्यार्थी शंतनू कुमार, अर्जुन देव आदित्य यांचे सहकार्य लाभले.