धुळ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षक अटकेत
By देवेंद्र पाठक | Updated: March 17, 2023 18:11 IST2023-03-17T18:11:30+5:302023-03-17T18:11:41+5:30
पश्चिम देवपूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या शिक्षकाला गुरुवारी अटक केली आहे.

धुळ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षक अटकेत
धुळे - खासगी शिकवणी घेणाऱ्या चित्रकलेच्या शिक्षकाने त्याच्याच शिकवणीमधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा निंदनीय प्रकार देवपूर भागात १५ दिवसांपूर्वी घडला होता. पश्चिम देवपूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या शिक्षकाला गुरुवारी अटक केली आहे.
देवपुरातील एका चित्रकलेच्या शिक्षणासाठी अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणीसाठी जात होती. नेहमीप्रमाणे २ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ती शिकवणीसाठी गेली होती. त्यावेळी संशयित शिक्षकाने तुला एमटीएसचे पुस्तके, पेन, कलर देतो असे सांगून त्याच्या घरी नेले. त्या अल्पवयीन मुलीशी अश्लील हावभाव करीत तो विवस्त्र झाला. शिवाय त्या मुलीला अश्लील चित्रण दाखविले.
पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला. त्यामुळे १५ दिवसांनंतर त्यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठले. त्या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पश्चिम देवपूर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता संशयित शिक्षकाला अटक केली. त्याच्या विरोधात भादंवि कलम ३५४ (अ), २९३, ५०९, यासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८ व १२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी. एन. चव्हाण करीत आहेत.