धोकेदायक रस्त्यावरून विद्यार्थ्यांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:18 IST2019-11-20T23:18:22+5:302019-11-20T23:18:53+5:30
हरण्यामाळ गावाकडे जाणार रस्ता : विद्यार्थ्यासह नागरिकांचे हाल, रस्ता दुरूस्तीची मागणी

Dhule
धुळे : यंदा झालेल्या मुसळधार पावसाने नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाला आहे़ तलावातील पाणी सोडण्यासाठी तयार केलेला बंधारा फुटल्याने हरण्यामाळकडे जाणारा रस्ता खचला आहे़ प्रशासनाकडून अद्याप रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने याच धोकेदायक रस्त्यावरून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे़
अक्कलपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे पाणी नकाणे तलाव भरण्यासाठी महिन्यापासून विसर्ग करण्यात आले आहे़ या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे पाणी हरण्यामाळ रस्त्याजवळून जाणाऱ्या सांडव्याव्दारे सोडण्यात येत आहे़ नकाणे तलाव भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग होण्यासाठी केलेला जुना बंधारा अनाधिकृतपणे बंद केला आहे़ त्यामुळे साक्रीरोडवरील जवाहर वैदयकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूने नव्याने तयार केलेला बंधारा या महिन्यात फुटल्याने हरण्यामाळ गावाकडे जाणारा रस्ता खचला आहे़ या रस्त्यावर खाजगी शैक्षणिक संस्था असल्याने सुमारे चारशे विद्यार्थी प्रवास करतात़ तर जवळचे वैद्यकीय रूग्णालय, कारखाना असल्याने रूग्णासह नागरिकांचा वावर असतो़
रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकाकडून दोन महिन्यापासून होत असतांना अद्याप हा रस्ता दुरूस्त करण्यात आलेला नाही़ त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़