धुळ्यात किरकोळ कारणाने दगडफेकीमुळे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 22:27 IST2020-11-03T22:27:04+5:302020-11-03T22:27:44+5:30
नटराज टॉकीज परिसर : पोलीस फौजफाट्यामुळे छावणीचे स्वरुप

धुळ्यात किरकोळ कारणाने दगडफेकीमुळे तणाव
धुळे : किरकोळ कारणावरुन शाब्दिक वादाचे पडसाद दोघांच्या हाणामारीत झाल्याने जमाव जमा झाला़ जमाव अंगावर येत असल्याचे लक्षात येताच दोघा-तिघांनी आपल्या दुचाकी तिथेच सोडून पळ काढला़ यावेळी दगडफेकीचा प्रकार होत असतानाच दोन दुचाकी जाळण्यात आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली़ पोलीस दाखल झाल्याने परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले़ रेड्यावरुन ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे़
शहरातील ८० फुटी रोडवरील नटराज टॉकीज परिसरात एक रेडा बांधलेल्या अवस्थेत होता़ तो रेडा आमचा असून त्याला सोडून द्या अशी मागणी करीत जुने धुळे गायकवाड चौकातील काही जण त्या ठिकाणी पोहचले़ यावेळी रेड्यावरुन वाद देखील सुरु झाले़ शाब्दिक चकमक होत असतानाच जमावातील एकाने दुसऱ्यावर हात उचलला़ परिणामी शिवीगाळ करीत हाणामारी सुरु झाली़ जमाव जास्त असल्याने गायकवाड चौकातून आलेल्यांनी समयसुचकता बाळगत दुचाकी सोडून पळ काढला़ याच भागात असलेल्या एका इमारतीत त्यांनी स्वत:ला लपविण्याचा प्रयत्न केला़ तो पर्यंत त्यांच्या दुचाकी जमावाने पेटवून दिल्याने अधिकच तणाव निर्माण झाला़ या भागात दोन गटात दगडफेकीला सुरुवात झाल्याची माहिती आझादनगर पोलिसांना कळाली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली़
पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून सौम्य लाठीचार्ज करीत गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला़ यावेळी झालेल्या धरपकडीत मुस्ताक शाह नावाच्या एकाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ या ठिकाणी असलेला रस्ता दोन्ही बाजुंनी बंद करण्यात आला़ येणाºया-जाणाºया सर्वांची चौकशी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरु होती़ घटनास्थळी पोलिस ठाण मांडून होते़ आझादनगर पोलीस ठाण्यात मुस्ताक शाह नामक संशयितांसह अन्य दोन ते तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़