वाळूची ७ वाहने अडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 22:31 IST2020-02-02T22:31:34+5:302020-02-02T22:31:52+5:30
दातर्तीच्या सरपंचाला कट मारल्याने तणाव : वाहने पोलिसांनी घेतली ताब्यात

वाळूची ७ वाहने अडविली
साक्री : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने दातर्ती येथील सरपंचाला कट मारल्याने, ते थोडक्यात बचावले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळू वाहतूक करणारे सात वाहने अडवून ठेवले होते़ घटनास्थळी पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी दाखल झाल्याने त्यांना पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनास्थळी दाखल झालेल्या महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी वाळू वाहतूक परवाना असल्याचे सांगितल्यावर सदर वाहनांमध्ये ओव्हरलोड वाळू असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती़ शेवटी सर्व वाहने साक्री पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला़
एक वर्षापूर्वी दातर्ती येथील तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांचा वाळू वाहतूक करणाºया वाहनाने बळी घेतला होता़ त्यानंतर त्याच घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिली आहे़ दातर्ती येथील पांझरा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू असते़ यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलनेही केली आहेत़ परंतु प्रशासनाचे वाळू माफियांची लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही़ आडमार्गाने जाणारे वाळू वाहतूक करणारे वाहने ओव्हरलोड वाळू घेऊन जातात़ त्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था आहे़ एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने आडमार्गाने का जातात, यामागचे गौड बंगाल लपलेले नाही़ या सर्व वाहनांवर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे़
रात्रीच्या वेळेस हे वाहने भरधाव वेगाने जात असल्याने छोट्या वाहनांना अनेक वेळा अपघातही झाले आहे़ हा अत्यंत गंभीर प्रकार असून वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याने साक्री तालुक्यात तीव्र संतापाचे वातावरण आहे़