सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल लूट’ थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:33+5:302021-09-07T04:43:33+5:30
धुळे : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वे मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. मात्र, सणासुदीच्या काळातही रेल्वेने ‘स्पेशल ट्रेन’ ...

सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल लूट’ थांबवा
धुळे : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वे मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. मात्र, सणासुदीच्या काळातही रेल्वेने ‘स्पेशल ट्रेन’ सुरू ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे जलद गाड्यांना अद्याप जनरल डबे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जादा भाडे देऊनच प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. प्रवाशांची होणारी ही ‘स्पेशल लूट’ थांबवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पश्चिम रेल्वेच्या सुरत - भुसावळ मार्गावर जलद प्रवासी गाड्या सुरू असल्या तरी ‘स्पेशल ट्रेन’ची संख्या कमीच आहे. मात्र, ज्या काही दोन गाड्या सुरू आहेत, त्यांनाही दुप्पटचे भाडे आकारण्यात येते.
जवळच्या स्थानकावर जाणारा प्रवासी जनरल डब्यातूनच प्रवास करीत असतो. मात्र, आता एक्स्प्रेस गाड्यांना ते डबेही जोडण्यात येत नसल्याने, प्रवाशांचे एक प्रकारे हाल होऊ लागले आहेत.
रेल्वे प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच सेवा पूर्ववत करण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असतांना उलट प्रवाशांची जादा भाड्यातून लूटच सुरू आहे
सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
हिसार एक्स्प्रेस
बरोली एक्स्प्रेस.
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार
कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रवासी जलद गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने कोविड एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या.
मात्र, गाडीत प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून या सर्व ‘स्पेशल ट्रेन’ म्हणून जाहीर करीत, भाडेही दुप्पट आकारण्यात येऊ लागले.
जवळच्या स्थानकावर जाण्यासाठीही दुप्पट भाडे आकारण्यात येत असून, ते सर्वांनाच भरणे शक्य नाही.
जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार
कोरोनापूर्वी सर्वच एक्स्प्रेस गाड्यांना दोन-तीन जनरल डबे लावण्यात येत होते.
मात्र, कोरोनापासून एक्स्प्रेस गाड्यांना लागणारे जनरल डबेच काढून टाकण्यात आले आहेत. आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नाही.
यामुळे सर्वसामान्य प्रवासी आता एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करू शकत नाहीत. जनरल डबे केव्हा अनलॅाक होणार असा प्रवाशांचा प्रश्न आहे.
जवळच्या गावाला जायचे तरी दुप्पट भाडे आकारण्यात येते. त्यामुळे अशा एक्स्प्रेसने प्रवास करणे परवडत नाही. ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे.
- संजय पवार,
प्रवासी
कोरोनानात अनेकांना फटका बसला आहे. अशा परिस्थितीत जादा भाडे देणे आता परवडत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही जादा भाडेवाढ मागे घ्यावी.
- दयाराम बोरसे
प्रवासी