दातर्ती येथे मूर्ती प्राणतिष्ठा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:05 IST2020-02-22T15:04:26+5:302020-02-22T15:05:00+5:30
धमनार : जय्यत तयारी, २४ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धमनार : साक्री तालुक्यातील दातर्ती येथील पांझरा, कान व भद्रावती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमापासून जवळच उभारण्यात आलेल्या त्रिलोकेश्वर महादेव मंदिरात २४ फेब्रुवारीपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यानिमित्त चार दिवस गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दातर्ती गावातील तरुणांनी श्री त्रिलोकेश्वर शिवधाम ट्रस्टची स्थापन करून पांझरा, कान व भद्रावती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमापासून जवळच नदीकाठी लोकवर्गणीतून मंदिर उभारले आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे.
२४ फेब्रुवारी सकाळी १० वाजता शोभायात्रा, गणपती पुण्यवाचन, दुपारी चार वाजता मूर्ती दशविधी स्थान, मूर्ती जलविधास कार्यक्रम होईल. २५ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता देवता स्थापना, मूर्ती व कलश स्थापना तर सायंकाळी पूजा व आरती होणार आहे.
२६ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा, १० ते साडेबारा वाजेपर्यंत पूजा, होमहवन व पूर्णकृती आरती होऊन रात्री आठ वाजता ह.भ.प. सुकदेव महाराज पिंप्राळेकर यांचे कीर्तन होणार आहे.
२७ फेब्रुवारी सकाळी साडेअकरा वाजता महाप्रसाद वाटपाने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती श्री त्रिलोकेश्वर शिवधाम ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी दिली.