धुळे : बियाणे आणि खताचे दर कमी केले नाहीत तर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सभेने दिला आहे. शेतीसाठी आवश्यक वस्तू, बियाणे आणि खतांचे भाव वाढविले म्हणून किसान सभेने केंद्र शासनाचा निषेध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या बेमोसमी पावसात असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाचे संकट असताना निसर्गानेही शेतकऱ्यांवर कहर सुरू केला आहे. राज्यात चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला असताना खते आणि बियाण्यांची दरवाढ थांबविण्याची गरज होती. परंतु, केंद्र सरकार केवळ राजकारण करण्यात आणि तिजोरी भरण्यात मग्न आहे, अशी टीका निवेदनात केली आहे. कृषी निविष्ठांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे दरवाढ त्वरित रद्द करावी, वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह काही खासगी बाजार समित्यांमध्येदेखील शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि पिळवणूक सुरू आहे. या ठिकाणी केवळ व्यापारी धड होत आहेत. शेतीमालास भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना भाव ठरविण्याचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत खतांचे, बियांण्याचे भाव वाढवून ठेवले आहेत. आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असून, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त केली आहे.
दरवाढ मागे न घेतल्यास राष्ट्रवादी किसान सभेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, कार्याध्यक्ष भटू पाटील, उपाध्यक्ष योगेश अहिरे, सलीम शेख, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, अंबादास मराठे, मोहन शिंदे, अजय गर्दे, सतीश चाैधरी, सलीम शेख कादर, सलीम शेख हनिफ, आदींच्या सह्या आहेत.