राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:10 IST2019-11-04T23:09:31+5:302019-11-04T23:10:12+5:30
जयकुमार रावल : शिंदखेडा तालुक्यात नुकसानाची पाहणी; आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

dhule
धुळे : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकºयांचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत शासन तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
शिंंदखेडा तालुक्यातील बाह्मणे, धमाणे व दलवाडे या गावातील शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकºयांशी संवाद साधला. तसेच शिंदखेडा येथील तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावे तसेच अतिवृष्टीमुळे पशुधनाची मोठी हानी झाली असून मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्या, घरांची पडझडीचे पंचनामे करण्याच्या सुचना अधिकाºयांना दिल्या़
यावेळी मंत्री रावल म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्या दृष्टीने १० हजार कोटींची तरतूद देखील मुख्यमंत्र्यांनी करून ठेवली आहे़
शेतकरी बांधवांनी या संकटामुळे हताश होऊ नये, राज्य व केंद्र शासन यांच्यामार्फत मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, कामराज निकम, माजी जि. प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, प्रांताधिकारी विक्रम बांदल, जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे, माजी सभापती जिजाबराव सोनवणे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, सुदाम महाजन, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी बोरसे यांच्या सह साक्री तालुक्याचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.