ग्रामदैवत भवानीमाता यात्रोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 22:33 IST2019-04-23T22:32:58+5:302019-04-23T22:33:53+5:30
वसमार : तगतरावाची मिरवणूक जल्लोषात

dhule
म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथे ग्रामदैवत भवानी माता यात्रोत्सवाला मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली.
वसमार येथे २३ रोजी ग्रामदैवत भवानी माता मंदिराला श्रीफळ वाहुन व प्रदक्षिणा घालून यात्रेला सुरुवात झाली. यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
दुपारी चार वाजता गावातून तगतरावाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यंदा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट असतानाही यात्रोत्सवात उत्साह दिसून आला. यात्रा परिसरात संसारोपयोगी साहित्य, विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल, रसवंती, ज्वेलरी, कटलरी यासह मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.
रोजगारानिमित्त बाहेरगावी असणारे वसमार येथील रहिवासी ग्रामदैवत भवानी मातेच्या यात्रोत्सवासाठी गावी परतल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी वीज, पाणी अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मनोरंजनासाठी मंगळवारी रात्री दहा वाजेनंतर लोकनाट्याचा कार्यक्रम पार पडला.