शिरपूर तालुक्यात रॉकेल वितरण सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:53 IST2020-07-01T21:53:21+5:302020-07-01T21:53:40+5:30
काशिरात पावरा, तुषार रंधे : डॉक्टर, बेड, व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याची मागणी

dhule
धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील विविध समस्या सोडविण्याची मागणी आमदार काशिराम पावरा आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी पालकमंत्र्यांकडे केली़ रुग्णालयांमधील मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री प्रश्न मांडला़ तसेच केरोसिनचे वितरण सुरू करण्याची मागणी केली़
धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर आमदार पावरा आणि तुषार रंधे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेवून विविध मागण्यांची वेगवेगळी निवेदने सादर केली़
शिरपूर शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे़ त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह कोवीड सेंटरमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, खाटांची क्षमता वाढवावी, आॅक्सीजन आणि व्हेंटीलेटर उपलब्ध करुन द्यावे, रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करावी, बंदोबस्तासाठी पोलिस बळ वाढवावे अशा मागण्या त्यांनी केल्या़
दरम्यान, कोरोनामुळे शासनातर्फे गरजू नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे़ परंतु स्वयंपाकाचा गॅस वेळेवर मिळत नसल्याने शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे़ शिवाय ग्रामीण भागात स्वयंपकाच्या इंधनाचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्यामुळे रॉकेलचे वितरण त्वरीत सुरू करावे़ अतीदुर्गम भागातील पाड्यांमधील ४२ हजार ४११ हमीपत्रांची तहसिलदारांकडे पुर्तता करुन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे़ याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे याआधी देखील निवेदन देण्यात आले आहे़ परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही़ तालुक्यातील नागरिक केरोसिनच्या लाभापासून वंचित आहेत़ शिवाय तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांनाही केरोसिनची गरज भासत असल्याने शिरपूर तालुक्यात त्वरीत केरोसिनचे वितरण सुरू करावे, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली़ जिल्हाधिकारी उपस्थित होते़