मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:49 IST2020-11-30T21:47:46+5:302020-11-30T21:49:20+5:30
विधानपरिषद निवडणूक ; मतदान यंत्रासह आवश्यक साहित्याचे वाटप

dhule
धुळे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान पथके मतदान साहित्यासह आपापल्या मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी रवाना झाले. या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीसाठी तयारी पूर्णत्वास आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र असतील. एकूण दहा मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर आज सकाळी मतदान पथके रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन भवनातून या मतदान पथकांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या मतदान पथकांमध्ये मतदान केंद्रांध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन, तीन, शिपाई आणि बंदोबस्तासाठी एका पोलिसाचा समावेश आहे. एकूण दहा पथके असून एक पथक राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. प्रत्येक मतदान पथकाजवळ सॅनेटायझर, मास्क, ग्लोव्हज, थर्मल गन, ऑक्सीमीटर, फेस शील्ड देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन वैद्यकीय अधिकारी व दोन सहाय्यकांचे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे.