ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट ; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:38+5:302021-09-02T05:17:38+5:30
धुळे : अनलॅाक झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरू झाली. सुरूवातीला केवळ महानगरांमध्येच जाणारी बस आता ग्रामीण भागातही ...

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट ; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?
धुळे : अनलॅाक झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरू झाली. सुरूवातीला केवळ महानगरांमध्येच जाणारी बस आता ग्रामीण भागातही जाऊ लागलेली आहे. मात्र अनेक गावांमध्ये अद्यापही मुक्कामी बसगाड्या सुरू न झाल्याने, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुक्कामी बस कधी सुरू होणार असा प्रवाशांचा प्रश्न आहे.
एसटीची सेवा अविरत सुरू असते. मात्र कोरोनामुळे दोन वर्षात दोनवेळा एसटी काही महिने बंद होती. मात्र त्यानंतरही एसटी प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली. अनलॅाकनंतर उत्पन्न वाढीसाठी सुरवातीला फक्त लांबपल्याच्या गाड्याच सुरू करण्यात आल्या. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र अजुनही अनेक आगारांनी मुक्कामी बसेस सुरू केलेल्या नाही.
ग्रामीणमध्ये जाणाऱ्या बसेसला प्रतिसाद
एसटी बंद असल्याने, अनेकजण खासगी वाहनांनीच प्रवास करीत होते. मात्र खासगी वाहनांचे भाडे जास्त होते. काहींनी तर प्रवाशांची गरज ओळखून जास्त पैसे वसूल केले. मात्र ज्या मार्गावर गर्दी आहे, ज्या ग्रामीण मार्गावर गर्दी आहे, त्या मार्गावर बसेस सुरू केल्या. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल
एकीकडे ग्रामीण भागात मुक्कामी बस नसतांना शहरी भागात जाण्यासाठी महामंडळातर्फे जादा गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. त्याचा फायदा प्रवाशांना होतो.
धुळे आगारातून नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव, चोपडा, या भागासाठी ठराविक कालावधीनंतर बसेसस सोडण्यात येतात. या सर्व गाड्या फुल्ल असतात. याशिवाय इतर आगाराच्याही लांबपल्याच्या गाड्या येथे येतात. त्याद्वारेही प्रवासी प्रवास करीत असतात.
ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचाच आधार असतो. सकाळी जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी जायाचे असल्यास खाजगी वाहन उपलब्ध नसते. त्यामुळे मुक्कामी असलेल्या बसचाच फायदा होत असतो. मात्र मुक्कामी बस असल्याने, पुढील नियोजन कोलमडते.
- एस.डी. वाघ,
प्रवासी
एसटीची सेवा पूर्ववत सुरू झालेली असतांना, ग्रामीण भागातच मुक्कामी बस का सुरू केली जात नाही, हा एक प्रश्नच आहे. वास्तविक ग्रामीण भागात सर्वात जास्त गर्दी ही पहिल्या बसलाच होत असते. त्यातून महामंडळाला उत्पन्न मिळते. त्यामुळे ग्रामीणच्या मुक्कामी बसेस सुरू कराव्यात.
- समाधान पाटील,
प्रवासी.
मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांचे काय?
धुळे आगारातूनही अनेक गावांसाठी मुक्कामी बसेस सुरू करण्यात आलेल्या होत्या. अनलॅाकनंतर यापैकी बहुतेक गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजुनही काह गावांमध्ये मुक्कामी बसेस सुरू झालेल्या नाहीत. या कधी सुरू होतील याचेही उत्तर मिळत नाही.
शाळा बंद असल्याने मुक्कामी गाड्या बंद
ग्रामीण भागात ॲानलाईन-ॲाफलाइन शिक्षण सुरू झालेले असले तरी शहरी भागात अजुनही शाळा, महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्यांची गर्दी जास्त असते. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने अजुनही ग्रामीणमधील मुक्कामी बसेस बंद असल्याचे एस.टी. कार्यालयातून सांगण्यात आले.