कोरोना काळातील ‘त्या’ भत्त्यापासून एसटीचे चालक-वाहक अद्यापही वंचित, आतापर्यंत १३१ पाॅझिटिव्ह, १०८ बरे, १७ जणांवर उपचार, तर ६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST2021-03-16T04:35:36+5:302021-03-16T04:35:36+5:30
गेल्यावर्षी लाॅकडाऊनमुळे हजारो प्रवासी जिल्ह्याच्या गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर अडकले होते. कोरोना काळात परराज्यात जाणाऱ्यांसाठी एसटीची विशेष सुविधा करण्यात ...

कोरोना काळातील ‘त्या’ भत्त्यापासून एसटीचे चालक-वाहक अद्यापही वंचित, आतापर्यंत १३१ पाॅझिटिव्ह, १०८ बरे, १७ जणांवर उपचार, तर ६ जणांचा मृत्यू
गेल्यावर्षी लाॅकडाऊनमुळे हजारो प्रवासी जिल्ह्याच्या गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर अडकले होते. कोरोना काळात परराज्यात जाणाऱ्यांसाठी एसटीची विशेष सुविधा करण्यात आली होती. एसटीच्या या फेऱ्या करणाऱ्या चालक, वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. तो अद्यापही मिळाला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चालक, वाहकांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, आतापर्यंत १३१ चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
एसटीने परराज्यात २०६६ फेऱ्या मारुन ४५ हजार ४५२ प्रवाशांना आपल्या राज्यात पोहोचविले.
१३१ पाॅझिटिव्ह, ६ मृत्यू
जिल्ह्यात गेल्या शुक्रवारपर्यंत १३१ चालक, वाहक आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी १०८ जण बरे होऊन सेवा बजावत आहेत; तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. लाॅकडाऊनच्या काळात प्रवासाची परवानगी मिळाल्यावर परराज्यात जाणाऱ्यांसाठी एसटीने विशेष फेऱ्या सुरू केल्या होत्या. अडकलेल्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने बसेस अहाेरात्र सुरू होत्या. चालक, वाहकच नव्हे, तर अधिकारी आणि कर्मचारीदेखील दिवसरात्र सेवा बजावत होते. बाधितांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाली.
२०६६
कोरोना काळात आपल्या जिल्ह्यातून परराज्यात एसटीच्या फेऱ्या झाल्या
१५००
चालकांनी दिली कोरोना काळात सेवा
१५००
वाहकांनी दिली कोरोना काळात सेवा
लाॅडाऊनच्या काळात परराज्यात एसटीच्या फेऱ्यांवर सेवा बजावणाऱ्या चालक, वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही. चालक, वाहकच नव्हे, तर अधिकारी, कर्मचाऱ्यांनीदेखील रात्रंदिवस महेनत घेतली होती. त्यांच्या सेवेचे मोल करता येणार नाही. परंतु चालक, वाहकांना जाहीर केल्याप्रमाणे त्वरित प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी आमची मागणी आहे.
- रामेश्वर चत्रे, अध्यक्ष, इंटक एसटी कामगार संघटना, धुळे
कोरोनाच्या काळात अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात, गावात पोहोचविण्यासाठी एसटीने महत्त्वाची भूमिका बजावली. कर्मचारी, अधिकारी यांनी अथक परिश्रम केले. चालक, वाहकांनी जोखीम पत्करुन सेवा बजावली. त्यांना डेपो स्तरावरुन प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पत्रव्यवहार केला असून, त्वरित भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत.
- मनीषा सपकाळ, विभागनियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, धुळे