मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पथकाची शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:25+5:302021-06-10T04:24:25+5:30
नेर येथे मोकाट कुत्र्यांनी हौदोस घातला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी एका व्यावसायिकावर कुत्र्यांनी हल्ला करीत, त्यांच्या दोन्ही पायांचे लचके ...

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पथकाची शोधाशोध
नेर येथे मोकाट कुत्र्यांनी हौदोस घातला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी एका व्यावसायिकावर कुत्र्यांनी हल्ला करीत, त्यांच्या दोन्ही पायांचे लचके तोडले होते, तर आधीही दोन ते तीन वर्षांत या मोकाट कुत्र्यांनी शिक्षक विकास उत्तम गवळे यांच्या दोन ते तीन शेळ्या फस्त केल्या आहेत.
आता या कुत्र्यांच्या झुंडी माणसांच्या मागे धावून थेट हल्ला करीत आहेत. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुले बाहेर पडण्यास टाळत आहे. त्यातल्या त्यात रायवट आदिवासी परिसर, दूधडेअरी परिसर, दुर्गा माता चौक, गांधीचौक, बाजारपेठ, खडक्या आदिवासी वस्ती, या भागात कुत्र्यांची खूप दहशत आहे.
हॉटेल व्यावसायिकाला घेरले कुत्र्यांनी
गावातील मेन रोड रायवट आदिवासी परिसरातून रविवारी पहाटे ५ वाजता म्हसदी फाट्यावरील हॉटेल सुरू करण्यासाठी भूषण भदाणे जात असताना, त्यांना १२ ते १५ कुत्र्यांनी घेरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रचंड घाबरले असताना, मार्निंग वाॅकला जाणाऱ्या महिलांनी या कुत्र्यांना दगड मारून हुसकवल्याने, जीव वाचला, अशा प्रतिक्रिया भदाणे यांनी दिली.
लवकरच कुत्र्यांचा बंदोबस्त करू
गावात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ते लोकांवर हल्ले करीत असल्याच्या तक्रारी येत आहे, म्हणून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी कुत्रे पकडणाऱ्या पथकाचा शोध घेत असून, लवकरच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल.
गायत्रीदेवी जयस्वाल, सरपंच, नेर ग्रामपंचयात.