इन्स्पायर विज्ञान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:13 IST2019-11-24T22:12:42+5:302019-11-24T22:13:19+5:30
शिरपूर : एच.आर.पटेल फार्मसी महाविद्यालयात आयोजन, विज्ञानावर मार्गदर्शन

Dhule
शिरपूर : येथील एच.आर. पटेल फार्मसी महाविद्यालयात घेण्यात येत असलेल्या इन्स्पायर विज्ञान शिबीराच्या तिसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ शिबीरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून इन्स्पायर नाव साकारले. शिबीराच्या आयोजनाने विज्ञानात आवड निर्माण झाल्याची व संशोधनात्मक वृत्तीला चालना मिळाल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
अहमदाबाद येथील अंकुर हॉबी सेंटरचे संचालक धनंजय रावल यांनी विज्ञान शिबीरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक या विषयावर मार्गदर्शन केले़ ते म्हणाले की, विज्ञान शिकविण्यासाठी फळा व खडूची गरज नाही. निसर्ग हा विज्ञान शिकविणारा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयात आपले शैक्षणिक भवितव्य घडवावे. विद्यार्थ्यांनी इंग्रजीसह विविध भाषा शिकाव्यात़ परंतू आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा. बुद्धीमत्ता ही मानवाला निसर्गाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. बुद्धीमत्ता, निरीक्षण शक्ती व कल्पकतेच्या आधारे काहीही अशक्य नाही, असेही ते म्हणाले. विज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिके दाखवून विज्ञानातील कठीण वाटणारे नियम व गुणधर्म अतिशय सुलभ पद्धतीने मांडून विद्यार्थ्यांची दाद मिळविली. त्यांनी लोहचुंबक, फुगा, कपबशी, मेणबत्ती, चेंडू, वजनकाटा इत्यादी दैनंदिन वापरातील साहित्यांच्या आधारे विज्ञानातील वायुगतीयामिक, गुरुत्वाकर्षण, घनता, पदार्थांच्या अवस्था यासारखे विषय विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्यांच्या मदतीने विज्ञानाचा अभ्यास कसा करावा, याबद्दल देखील त्यांनी प्रबोधन केले.
पुणे येथील डॉ.अशोक रुपणर यांनी हसत खेळत विज्ञानाचे शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, गॅलिलिओ, आर्यभट्ट, लुईस पाश्चर, सी.व्ही. रमण यांच्या संशोधनावर प्रकाशझोत टाकत देशाच्या आर्थिक स्थितीत आमुलाग्र बदल घडविण्यासाठी संशोधनातील क्रांती अत्यावश्यक आहे. आजच्या युगात ज्ञान हीच मोठी शक्ती आहे. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगिण विकास आहे. आपल्या विकासात अळथळा ठरत असलेल्या गोष्टींचा शोध घ्या व त्यावर मात करून यशस्वी बना. कुशल वैज्ञानिक बनण्यासाठी तीक्ष्ण निरीक्षणशक्ती व सखोल ज्ञानाची गरज आहे, असे सांगत विविध जीवशास्रीय, रसायनशास्रीय प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांच्या मदतीनेच सादर करून दाखविली. त्यात कलात्मक पद्धतीने दैनंदिन जीवनातील विज्ञान विद्यार्थ्यांसमोर मांडले. आकुंचन व प्रसरणाने होणारे बदल, सेलविरहीत बॅटरी, पवन चक्कीतून वीज निर्मिती, सौरचूल, डी.एन.ए., आर.एन.ए. इ.बद्दल प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त माहिती सांगितली.
यावेळी वैज्ञानिक डॉ.अरविंद रानडे, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, डॉ.ए.डी. कर्वे, डॉ.अरविंद रानडे, डॉ.गणेशन, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य डॉ.एस.बी. बारी, डॉ.व्ही.के. चटप उपस्थित होते.