धुळे जिल्ह्यात ८५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:45 IST2020-01-13T11:44:59+5:302020-01-13T11:45:24+5:30
यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढले, जिल्ह्यात अजुनही पेरणी सुरूच, उत्पन्नात होणार वाढ

धुळे जिल्ह्यात ८५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. १० जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली असून, अजुनही काही ठिकाणी गव्हाची पेरणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान वातावरणाने चांगली साथ दिली तर यावर्षी रब्बीच्या उत्पादन चांगले वाढू शकते.
गेल्या तीन वर्षांपासून धुळे जिल्ह्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहे. अपेक्षित पाऊस नसल्याने, त्याचा परिणाम पीक खरीपाबरोबर रब्बीच्या लागवडीवर होत होता.
गेल्यावर्षी जून महिना वगळता जुलै ते आॅक्टोबर अखेरपर्यंत दमदार पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाची टक्केवारी १०० टक्यांपेक्षा अधिक होती.
जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पिकांची लागवड होत असते. २०१८ मध्ये वर्षी पाऊस नसल्याने, अवघ्या ५० हजार ६३१ हेक्टर क्षेत्रावरच रब्बीची पेरणी होऊ शकली होती. परंतु गेल्यावर्षी पावसाची सरासरी प्रमाणापेक्षा जास्त असल्याने रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यावर्षी किमान १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊ शकेल असा अंदाज आहे.
जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात मुख्यत: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, मका, रब्बी सूर्यफूल यांचे पिक घेतले जाते.या पिकांची पेरणी प्रामुख्याने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येत असते. मात्र आॅक्टोबर अखेरपर्यंत झालेल्या तसेच मध्यंतरीही पावसाने हजेरी लावल्याने, शेतात ओलावा कायम होता. खरीपाची पिके शेतात उभी होती. शेतीची मशागतही झाली नव्हती. त्यामुळे रब्बींच्या पेरण्यांना वेळ झाला. जिल्ह्यात २० नोव्हेंबर पासून रब्बीच्या पेरण्या सुरू झालेल्या आहेत. आतापर्यंत ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झालेली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. यात सर्वाधिक लागवड, गहू,हरभरा, रब्बी ज्वारी व मक्याची करण्यात आलेली आहे.
तर उत्पादन चांगले..
दरम्यान पीक उगवणीनंतर वातावरण चांगले राहिले, अवकाळी पाऊस झाला नाही तर रब्बीचे उत्पन्न चांगले येऊ शकते. त्यामुळे खरीपात झालेले नुकसान रब्बीत भरून निघेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे