धुळ्यात ऊसाचा थंड गोडवा करतोय आत्मा गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:59 IST2020-03-12T22:58:49+5:302020-03-12T22:59:10+5:30
उन्हाळा : चौकाचौकात रसवंत्या, पारंपारीक रसवंतीवर गर्दी, कोरोनामुळे कोल्ड्रींक्सला मागणी घटली

धुळ्यात ऊसाचा थंड गोडवा करतोय आत्मा गार
धुळे : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात ठिकठिकाणी रसवंतीची दुकाने सुरू झाली आहेत. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी उसाच्या रसाला पसंती दिली आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळा आला की रसवंत्या नजरेस पडतात़ यंदा देखील शहरातील मुख्य रस्त्यांवर उसाच्या रसाची दुकाने थाटली आहेत. साक्री रोड, वाडीभोकर रोड, महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय नजीक असलेल्या रसवंतीवर नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच एसटी महामंडळाच्या कार्यालया शेजारी पारंपरिक पद्धतीने बैलाचा वापर करून घाण्यावरचा ऊसाचा रस काढला जातो़ ही रसवंती धुळेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
कोरोना व्हायरसच्या भितीमुळे कोल्ड्रिंक्सला नकार देत ऊस, मोसंबीच्या रसाला ग्राहकांनी पसंती दिली आहे. तापमान वाढले की कोको कोला, पेप्सी, थम्प्स अप, स्प्राईट आदी देशी विदेशी थंड पेय बनवणाऱ्या कंपन्यांची चांदी असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या भीतीमुळे नागरिकांनी शीतपेयांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे़ सोशल मीडियात देखील कोल्ड्रींक्स टाळण्याच्या सूचना असलेले संदेश काही दिवसांपासून फिरत आहेत. कोरोनामुळे कोल्ड्रींक्स बनविणाºया कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, उन्हाची तिव्रता आता वाढली आहे़ वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी महिला, मुलींकडून स्कार्फला मागणी वाढली आहे़ तरुणांनी देखील टोप्या वापरायला सुरूवात केली आहे़ काळे चष्मे तसेच मास्क खरेदी करण्यासाठी देखील गर्दी होत आहे़