तारांचा स्पर्श होताच धुळ्यानजिक कापसाचा ट्रक पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 22:33 IST2021-02-16T22:32:43+5:302021-02-16T22:33:04+5:30
अवधान एमआयडीसीजवळील घटना

तारांचा स्पर्श होताच धुळ्यानजिक कापसाचा ट्रक पेटला
धुळे : अवधान एमआयडीसीजवळ कापसाने भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श होताच कापसाने पेट घेतला. ही घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. यात हजारो रुपयांचे नुकसान झाले असून मोहाडी पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली.
ट्रकमध्ये कापूस भरुन तो धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान एमआयडीसीजवळ हा ट्रक आल्यानंतर ट्रकच्या उंचीपेक्षा अधिकचा कापूस त्यात भरलेला असल्याने वीज तारांचा स्पर्श ट्रकला झाला. यात स्पार्किंग झाल्याने ठिणग्या कापसावर पडल्या. क्षणार्धात कापूस पेटला, त्यात सायंकाळी हवेचे प्रमाण तसे अधिक असल्यामुळे आग भडकली. यात हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला. आग मोठी असल्यामुळे कापसासह ट्रक देखील पूर्णपणे जळून खाक झाला. अचानक लागलेल्या आगीमुळे महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती. यात सुदैवाने जिवीतहानी टळली असलीतरी लाखो रुपयांचे नुकसान मात्र झालेले आहे. घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना कळताच पथकाने धाव घेतली. घटनेचे गांभिर्य ओळखून महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले. बंब दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मोहाडी पोलीस ठाण्यात अग्नीउपद्रवची नोंद करण्यात आली.