नियमांचे उल्लंघन केल्याने सोनगीरला दारु दुकान मालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 21:43 IST2021-03-13T21:43:35+5:302021-03-13T21:43:55+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने उचलले टोकाचे पाऊल

नियमांचे उल्लंघन केल्याने सोनगीरला दारु दुकान मालकावर गुन्हा
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने सोनगीर गाव कंन्टेन्मेंट क्षेत्र घोषीत केले आहे. तसेच दुकाने, हॉटेल सर्व व्यवहार रात्री ८ वाजेनंतर बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करीत रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री सुरु ठेवणारी दुकाने, बिअर शॉप, हॉटेल चालकावर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी शिरीष रंगनाथ भदाणे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सोनगीर फाटा येथे असलेले हॉटेल कस्तुराई बिअर शॉप, हॉटेल मानसी परमीटरुम बिअर बार तसेच गावातील अन्य देशी दारु दुकानातून कोरोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव फैलावू नये यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन करुन रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरु ठेवल्याचे आढळून आले. गुरुवारी रात्री ९ ते साडेनऊ वाजेपर्यंत ही दुकाने सुरु होती. मद्य विक्री केली जात होती. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशानुसार लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे आणि जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कस्तुराई बिअर शॉपचे मालक समाधान कृष्णा जगदाळे, गोपाल अर्जून माळी, मानसी परमीट रुमचा मॅनेजर रोहित सुरेश माळी आणि मालक राजेंद्र भगवान माळी तसेच देशी दारु दुकानाचा मॅनेजर संदिप छबीलाल माळी (रा. सोनगीर) व मालक किशोर छबाचंद छाबडीया (रा. दोंडाईचा) या सहा जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा तपास सोनगीर पोलीस करीत आहेत.