अवघे बोरकुंड झाले ‘भगवामय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:58 IST2020-02-08T22:57:58+5:302020-02-08T22:58:21+5:30
मराठा सेवा संघ । राष्ट्रीय ग्रामीण अधिवेशनात हजारोंचा सहभाग

अवघे बोरकुंड झाले ‘भगवामय’
धुळे : वाद्यवृंदाच्या तालात विद्यार्थ्यांचे लेझीम, टिपरी नृत्य सादर करीत शनिवारी सायंकाळी सम्राट बळीराजाची शोभायात्रा काढून मराठा सेवा संघाच्या ग्रामीण राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली़ महिलांनी भगव्या रंगाची साडी, भगवा फेटा आणि घरांवर भगवा झेंडा लावल्यामुळे धुळे तालुक्यातील बोरकुंड गाव अवघे भगवामय झाले होते़
या शोभायात्रेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य आशुतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देविदास सोनवणे, शालीनी भदाणे, संग्राम पाटील, सेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सेनेचे महानगर प्रमुख डॉ. सुशिल महाजन, निशा महाजन, नानासाहेब कदम, निंबा मराठे, एस. आर. पाटील, सरपंच व महाअधिवेशनाचे निमंत्रक बाळासाहेब भदाणे, संघाचे कार्याध्यक्ष अर्जूनराव तनपुरे, सी. एन. देसले, देवेंद्र अहिरे, विभागीय अध्यक्ष दिपक भदाणे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, यांच्या हस्ते बळीपुजन करण्यात येणार आहे.
कॉम्रेड शरद पाटील यांचे नाव
महाअधिवेशन होत असलेल्या मुक्तांगण शैक्षणिक संकुल (बोरकुंड) या स्थळाचे कॉम्रेड शरद पाटील नगरी असे नामकरण करण्यात आले आहे. मंडपाच्या सुरुवातीलाच प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारे बॅनर लावण्यात आले आहे.
अधिवेशनात त्यांचेही स्मरण
मराठा सेवा संघाचे पहिले ग्रामीण महाअधिवेशन होत असतांनाच, या कार्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या काही व्यक्तींचे स्मरण याठिकाणी करण्यात आले आहे. मराठा सेवा संघाच्या वाटचालीसाठी महत्वपूर्ण योगदान असणारे धुळे जिल्हाचे सुपूत्र व निवृत्त कार्यकारी अभियंता वसंतराव बेडसे यांचे बॅनर याठिकाणी लावण्यात आहे़ तसेच या विचारपीठाला वसंतराव बेडसे यांचे नाव देण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडच्या जडणघडणीत योगदान असणारे माजी अध्यक्ष मनोज पाटील, धमेंद्र पवार व सुनिल माळी यांचीही आठवण करणारे बॅनर याठिकाणी लावण्यात आले आहे.
पथकाने वेधले लक्ष
सारख्या पेहरावातील ४० युवक आणि युवतींच्या लेझिमसह टिपरी नृत्य, ढोल ताशांचा गजर व ध्वज पथकाने बोरकुंड परिसराचे लक्ष वेधले. सम्राट बळीराजाच्या मिरवणुकीत अग्रस्थानी असलेले हे ध्वज पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
भोजनाची व्यवस्था
अधिवेशनाला येणाऱ्यांसाठी शनिवारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती़ हीच सुविधा रविवारीही करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. दरम्यान, हजारो नागरिक असूनही कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नसल्याचे दिसून आले़
मंडप व बैठक व्यवस्था
महाअधिवेशनस्थळी २४ हजार चौरस फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासुन हे काम सुरु होते. उपस्थितांसाठी याठिकाणी साडेतीन हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असुन भोजनासाठीही स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे.
मिरवणुकीत झळकली महापुरुषांची पोष्टर्स
सम्राट बळीराजांच्या मिरवणुकीत विविध महापुरुषांची पोष्टर फिरविण्यात आली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, मदर टेरेसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मोहम्मद पैगंबर आदी महापुरुषांची पोष्टर मिरवणुकीत महिलांनी हातात घेतली होती. सजविलेल्या रथावर सम्राट बळीराजाचे कटआऊट लावुन मिरवणुक काढण्यात आली.
देशभरातून समाजबांधव येणार
या राष्ट्रीय महाअधिवेशनसाठी महाराष्ट्रासह, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील समाजबांधव येणार आहेत. या अधिवेशनासाठी छत्तीसगड राज्यातील महिलांचे पथक येणार असल्याचे सांगण्यात आले. महाअधिवेशनासाठी देशातून किमान चार ते पाच हजार नागरिक उपस्थित राहतील असा आयोजकांचा अंदाज आहे. दरम्यान, शनिवार सकाळपासून समाजबांधव याठिकाणी येण्यास सुरुवात झाली होती़ मुख्य कार्यक्रम रविवारी असल्याने त्याच दिवशी सर्वाधिक गर्दी होईल असे सांगण्यात आले.
पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था
महाअधिवेशनासाठी अनेकजण आपल्या वाहनाने धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात येत आहेत़ त्यासाठी अधिवेशन स्थळाच्या बाजूलाच दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना ते सुलभ होत आहे़