धुळे एमआयडीसीत पिस्तुलचा धाक दाखवून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 13:13 IST2017-12-24T13:12:22+5:302017-12-24T13:13:35+5:30
अवधान शिवार : तिजोरीतील १० लाख घेवून पोबारा

धुळे एमआयडीसीत पिस्तुलचा धाक दाखवून लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अवधान एमआयडीसीमध्ये शनिवारी मध्यरात्री तिघांनी शेंगदाणा कंपनीत पिस्तुलचा धाक दाखविला़ भरजबरीने तिजोरीतील १० लाख रुपयांची रोकड घेवून पोबारा केला़ आरडा-ओरड करुनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही़ सकाळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांनी भेट दिली़
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत अवधान एमआयडीसीमध्ये कानसिंग प्रेमसिंग राजपुरोहित (रा़ गुडानाल ता़ शिवाना जि़ बाडमेर) यांच्या मालकीचे भवानी ट्रेडर्स आहे़ या कंपनीमार्फत शेंगा खरेदी करुन त्याचे शेंगदाणे बनवून विक्री करण्याचे काम चालते़ या कंपनीत सुजानसिंग वगताजी राजपुरोहित हे मॅनेजर आहेत़ त्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार शनिवारी मध्यरात्री कंपनीत झोपलेले असताना २० ते २५ वयोगटातील तीन जण आले़ त्यांनी कंपनीचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला़ दरवाजा कोण वाजवितो आहे, हे पाहण्यासाठी खिडकी खोलून पाहिले असता तिघांपैकी एकाने पिस्तुलचा धाक दाखवित दरवाजा उघडण्याचे सांगितले़ दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला असता थेट गोळीही झाडण्यात आली़ दरवाजा तोडून या तिघांनी आत प्रवेश केला़ तिजोरीत ठेवलेले १० लाख रुपयांची रोकड घेवून पोबारा केला़ त्यांच्यातील एकाने मारहाण देखील केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़
याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार भादंवि कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील करीत आहेत़