धुळ्यात खोदकाम करतांना सापडली चांदीमिश्रीत नाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 17:53 IST2017-10-28T17:52:34+5:302017-10-28T17:53:52+5:30
पोलिसांनी ५०० नाणी घेतली ताब्यात, ही नाणी पुरातत्व विभागाकडे देणार

धुळ्यात खोदकाम करतांना सापडली चांदीमिश्रीत नाणी!
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील गल्ली क्रमांक २ मध्ये घराच्या कामासाठी खोदकाम करताना चांदीमिश्रीत ५०० नाणी सापडली आहेत़ सदर नाणी ही धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुरातत्व विभागाकडे ती जमा करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे़
शहरातील गल्ली क्रमांक दोन मधील जैन भवनाजवळ अॅड़ मनोज अनिलकुमार हेडा यांच्या घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम शुक्रवारी सुरु करण्यात आले़ त्यावेळी मजुरांना एक पत्र्याचा डबा सापडला़ हा डबा पूर्णपणे जीर्णावसस्थेत होता़ यावेळी अॅड़ हेडा हे घटनास्थळी हजर असल्याने त्यांनी हा डबा ताब्यात घेतला़ यावेळी डब्यामध्ये चांदी मिश्रीत नाणे असल्याचे निदर्शनास आले़
त्यामुळे हेडा यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना ही माहिती दिली़ सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील, उपनिरीक्षक नाना आखाडे, राजेंद्र माळी, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नारायण कळसकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे, जगदीश खैरनार, मुक्तार मन्सुरी, एखलाख पठाण, विनायक सोनवणे, महेश जाधव, योगेश चव्हाण, राहूल पाटील, दिनेश शिंदे, संजय जाधव, दीपक दामोदर, संदीप पाटील घटनास्थळी पोहचले़ यावेळी घटनास्थळी खात्री केल्यानंतर ही नाणी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आली़ मान्यताप्राप्त सराफास पाचारण करण्यात येऊन या नाण्यांची तपासणी करण्यात आली़ या नाण्यांमध्ये चांदीचा अंश असल्याचे स्पष्ट झाले़ या डब्यात १ लाख २० हजार २२८ रुपये किंमतीचे ५०० नाणी मिळून आली. परिणामी ही नाणी कायदेशीर प्रक्रियेने ताब्यात घेण्यात आली़
यासंदर्भात न्यायालय, जिल्हा प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभागाला पत्र देण्यात आलेले आहे़ या नाण्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे़ ही नाणी ब्रिटीशकालीन असून त्यावर जार्ज पंचम यांचा फोटो आहे़ तसेच वेगवेगळ्या तीन भाषेत एक रुपया असे नमूद केले आहे़ वरिष्ठ अधिकाºयांना याची माहिती दिली आहे़