बसस्टॅण्डला अतिक्रमणाचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:32 IST2019-07-28T22:32:36+5:302019-07-28T22:32:47+5:30
शिरपूर तालुका : वाडी स्थानक बनले अस्वच्छतेचे आगार, दुरवस्थेने प्रवासी त्रस्त

बसस्टॅण्डला अतिक्रमणाचा वेढा
बभळाज : शिरपूर तालुक्यातील वाडी येथील प्रवासी निवारा शेडला खाजगी दुकानदारांनी दुकाने थाटून अतिक्रमणाचा वेढा दिला आहे. तसेच बस स्थानक अस्वच्छतेचे आगरही बनले असून येथे प्रवाशांना उभे राहणे देखील शक्य नाही, अशी अवस्था झाली आहे. येथे नवीन प्रवासी शेड बांधण्यात यावे, अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे.
वाडी हे गाव शिरपूर-बोराडी रस्त्यावरील मोठे व महत्वाचे स्थानक असून हे गाव वाडी बु।।व वाडी खुर्द असे विभागले गेले आहे. मात्र, दोन्ही गावांचा प्रवासी थांबा एकच आहे. दोन्ही गावांची मिळून एकूण लोकसंख्या सुमारे ७ हजारापर्यंत आहे. या गावाच्या पंचक्रोशीतील चांदसे, चांदसुर्या, जुने चांदुसुर्या, वाघबर्डी, वासर्डी इत्यादी गावातील प्रवाशांना वाडी येथे येऊनच पुढील प्रवासाला जावे लागते.
तसेच या सर्व गावातील महाविद्यालयीन विद्यार्थीही वाडी येथून मार्गस्थ होत असतात. या सर्व प्रवाशांची येथील पडक्या प्रवासी थांब्यामुळे गैरसोय होत आहे. प्रवाशांना निवारा शेडमध्ये कचरा घाणीचे साम्राज्य असल्याने परिसरातील टपºया, चहाच्या हॉटेलचा आसरा घ्यावा लागत आहे.
प्रवासी थांब्याच्या सर्व बाजूंनी खाजगी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने बºयाचदा बाहेरगावच्या प्रवाशांना सदर प्रवासी निवाराशेड दिसत नाही. म्हणून प्रवासी थांब्याच्या जवळ असलेले अतिक्रमण त्वरित काढून प्रवाशांची कुंचबणा थांबवावी. तसेच याच जागेवर नवीन प्रवासी थांब्याचे बांधकाम करण्यात यावे अथवा याच शेडची संपूर्ण दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील प्रवाशी व ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत सदर रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी उपविभाग क्र.१ कडे असून रस्त्याशी संबंधित दोन्ही कनिष्ठ अभियंत्यांची बदली झाल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या विभागाने सदर बस थांब्याच्या भोवती असलेली अतिक्रमण काढण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत किंवा नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही.