दुकानांचे शटर डाऊन, नागरिकांचे अपडाऊन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:45+5:302021-04-23T04:38:45+5:30
धुळे : प्रशासनाच्या आदेशानुसार धुळे शहरात सकाळी ११ वाजता दुकानांचे शटर डाऊन होत असले, तरी नागरिकांचे अपडाऊन मात्र सुरूच ...

दुकानांचे शटर डाऊन, नागरिकांचे अपडाऊन सुरूच
धुळे : प्रशासनाच्या आदेशानुसार धुळे शहरात सकाळी ११ वाजता दुकानांचे शटर डाऊन होत असले, तरी नागरिकांचे अपडाऊन मात्र सुरूच असल्याने कोरोनाचा संसर्ग कसा रोखणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोराेनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दी होत आहे. रिकामटेकड्यांपुढे पोलिसांनीही हात टेकले आहेत.
कोरोनाची संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ‘ब्रेक दे चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. निर्बंध असले तरी शहरात गर्दी कायम असल्याने सकाळी ७ ते ११ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. ११ नंतर कुणालाही बाहेर पडता येणार नाही अशा सक्त सूचना आहेत. असे केल्याने गर्दी कमी होईल असा प्रशासनाचा अंदाज होता; परंतु हा अंदाज अवघ्या दोनच दिवसांत फोल ठरला आहे. कारण सकाळी ११ वाजता दुकानांचे शटर डाऊन होत असले तरी रिकामटेकड्यांचे अपडाऊन मात्र सुरूच आहे. दुपारी १२ नंतर उन्हाचा तडाखा वाढतो म्हणून सहसा कुणी बाहेर पडत नाही; परंतु सायंकाळी ४ वाजल्यानंतर मात्र दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरून शहरातील रस्त्यांवर कमालीची वर्दळ वाढते. प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून जीवघेणी गर्दी पाहायला मिळत आहे.
रिकामटेकड्यांना वठणीवर आणण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. बॅरिकेडस् लावले आहेत. तपासणी होत आहे; परंतु चोरट्या रस्त्यांनी पोलिसांची नजर चुकवून, खोटी कारणे सांगून, बनावट आयडी दाखवून रिकामटेकड्यांचे फिरणे सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील हात टेकले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे लाठीचा प्रसाद वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.