अष्टान्हिक पर्वानिमित्त श्री सिद्धचक्र विधान कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:26 IST2019-07-19T23:26:09+5:302019-07-19T23:26:40+5:30
सोनगीर येथे आयोजन : दोन आठवड्यांपासून विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात, मिरवणुकीने सांगता

पालखी मिरवणुकीत समूह नृत्य करताना महिलावर्ग.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : येथील दिगंबर जैन समाजातर्फे श्री १००८ पुष्पदन्त जैन मंदिरात सकल जैन समाजाकडून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अष्टान्हिक महापर्वानिमित्त नुकताच आयोजित श्री सिद्धचक्र मंडल विधान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या निमित्ताने गेल्या दोन आठवड्यांपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विधान भव्य मिरवणुकीने सुरूवात करून मंदिरात ध्वजरोहण व कलश स्थापना करून सिद्धचक्र मंडल विधानाला सुरवात करण्यात आली होती.
दरम्यान पूजेसाठी इंद्र-इंद्राणी म्हणून भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावर्षी विधानात तीस वर्षानंतर सुमारे २३०० नारळाचा भरणा करण्यात आला होता. या काळात पूजन, जप, महाआरती अशा विविध कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला. हे विधान मंदिरात आठ दिवसांपासून सुरू होते. दरम्यानच्या काळात विधान पूजन, जप करण्यात आले. यावेळी विधीचे वाचन पुजारी विरेंद्र जैन यांनी केले.
याप्रसंगी सोनगीर व परिसरातील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी विधान विसर्जनानिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी महिला, पुरुष जैन समाजबांधव उत्साहात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मंदिरात स्वस्थानी पोहचल्यानंतर महाआरती करुन विधानाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन समाज बांधव, मंदिर विश्वस्त मंडळ, महिला मंडळ, जैन युवा मंडळ सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
या कालावधीत गावात सर्वत्र चैतन्य व उत्साहाचे वातावरण होते.