मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST2021-09-03T04:37:33+5:302021-09-03T04:37:33+5:30
कोरोनाच्या अनुषंगाने जवळपास सर्वच बाबींवर केंद्र आणि राज्य सरकारने निर्बंध लावले होते. तब्बल दीड वर्षानंतर कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर ...

मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?
कोरोनाच्या अनुषंगाने जवळपास सर्वच बाबींवर केंद्र आणि राज्य सरकारने निर्बंध लावले होते. तब्बल दीड वर्षानंतर कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यात बंद असलेले सर्वच व्यवहार पूर्ववत करत असताना मंदिरे मात्र कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेली आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी हा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत असून, माणूस जगला पाहिजे, अशी ठोस भूमिका घेतली जात असताना विरोधकांकडून आरोप करीत मंदिरे बंद ठेवून काय साध्य केले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अंतर्मनात हवी श्रद्धा
श्रद्धा ही आपल्या अंतर्मनात असायला हवी. कोरोनामुळे परिस्थिती कठीण असताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. राज्य शासन योग्य तो निर्णय घेत आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाने केलेल्या सूचनांप्रमाणे अंमलबजावणी केली जात आहे.
- श्यामकांत सनेर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
माणूस वाचला पाहिजे
मंदिरे उघडायला पाहिजेत यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही; परंतु तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालनही करणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. माणूस वाचला पाहिजे. कोरोनामुळे नियमांचे पालन करायला हवे.
-हिलाल माळी, जिल्हा प्रमुख, शिवसेना
नियमांचे पालन करावे
मंदिरे हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे. त्याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. माणूस महत्त्वाचा आहे. नियमांचे पालन करायला हवे. यात राजकारण कोणी खेळू नये.
-किरण शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
आता मंदिरे उघडावीत
कोरोनाच्या अनुषंगाने मंदिरांसह सर्वच बाजारपेठ बंद होती. आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने सर्व बंद व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने मंदिरेदेखील उघडायला हवीत. मंदिरे बंद करून काय साध्य होईल. नियमांचे पालन करीत मंदिरे उघडावीत.
-अनुप अग्रवाल, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप
विश्वस्त म्हणतात...
कोरोनाच्या अनुषंगाने खान्देशची कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचे मंदिर आजही बंदच आहे. केवळ पूजाविधीपुरता मंदिर उघडले जाते.
मंदिर बंद असल्यामुळे येणारे भाविक दूरवरूनच मूर्तीचे दर्शन घेतात. मंदिरे उघडण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे ठोस निर्देश शासनाकडून आलेले नाही.
-सोमनाथ गुरव, विश्वस्त एकवीरा देवी मंदिर