देवपुरातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत शिवसेनेने विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:25 IST2021-06-17T04:25:06+5:302021-06-17T04:25:06+5:30
धुळे : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उप अभियंत्यांना घेराव घालत शिवसेनेच्या पदाधिकारींनी देवपुरातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत जाब विचारला. रस्त्यांची त्वरित ...

देवपुरातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत शिवसेनेने विचारला जाब
धुळे : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उप अभियंत्यांना घेराव घालत शिवसेनेच्या पदाधिकारींनी देवपुरातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत जाब विचारला. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती झाली नाही तर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. देवपूरवासीयांच्या नशिबी यंदाच्या पावसातही नरकयातना या शीर्षकाखाली लोकमतने बुधवारच्या अंकात देवपुरातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित केले. भूमिगत गटार योजनेमुळे खोदलेले रस्ते पावसाळ्याच्या आधी दुरुस्त केलेले नसल्याने सर्वच रस्त्यांवर चिखल साचला आहे. त्यामुळे रहिवाशांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात लोकमतचा अंक झळकवित उप अभियंता कुलकर्णी यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
देवपुरात भूमिगत गटार योजनेचे काम अतिशय निकृष्ट, नियोजनशून्यपणे सुरू असून ठेकेदारावर कुणाचाही अंकुश राहिला नाही. त्यामुळे रस्त्यांची पार दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था आहे. रस्त्यांची दुरुस्ती करून रहिवाशांना दिलासा दिला नाही तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला टाळे ठोकून काम बंद केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिका या दोन्ही यंत्रणांचा भोंगळ कारभार सुरू आहे. ठेकेदाराला पाठिशी घातल्याने ठेकेदार मुजोर झाला आहे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन मोजमाप न करता कार्यालयात बसून बिले अदा केली जात आहेत. १४२ किलोमीटरपैकी केवळ १४ किलोमीटर गटारीचे काम झाल्याचे सांगतात. तसेच ६० किलोमीटरचे रस्ते दुरुस्त करण्याची आवश्यकता असताना रहिवाशांना वेठीस धरले जात आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, समन्वयक गुलाब माळी, संदीप चव्हाण, संदीप सूर्यवंशी, बबन थोरात, पंकज भारस्कर, संजय वाल्हे, सचिन बडगुजर, ललित माळी, एजाज हाजी, केशव माळी, भटू गवळी, मच्छिंद्र निकम, शरद गोसावी, शोएब मिर्झा आदी उपस्थित होते.