धुळ्यातील तरुणाच्या खुन प्रकरणी दोघांना शिताफिने अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 13:07 IST2020-07-17T13:07:03+5:302020-07-17T13:07:28+5:30
कालिकामाता मंदिराजवळील घटना : पैसे लुट करताना प्रतिकार केल्याच्या रागातून घडला प्रकार

धुळ्यातील तरुणाच्या खुन प्रकरणी दोघांना शिताफिने अटक
धुळे : मोबाईल आणि पैशांची लूट करत असताना त्याला प्रतिकार केल्याने रागाच्या भरात साथीदाराच्या मदतीने डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून केल्याची कबुली दोघांनी दिली आहे़ अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली़
धुळे शहरातील शिवाजी रोडवरील कालिका माता मंदिराजवळ जितेंद्र शिवाजी मोरे या ३५ वर्षीय तरुणाचा शनिवारी पहाटेच्या सुमारास कोणीतरी दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात तरुणाच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़ या घटनेचा तपास शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचा संयुक्त तपास सुरु होता़ अशाताच शनिवारी पहाटे मारहाण करुन पैसे हिसकावून दोन अनोळखी इसमांबद्दल स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार तपासाला सुरुवात करण्यात आली़ याप्रकरणी राहुल उर्फ हंक्या सुनील घोडे (१९, रा़ दैठणकर नगर, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे) याला ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी केली असता त्याने खुनाचा गुन्हा हा मयत तरुणाचा मोबाईल व पैसे लुट करत असताना प्रतिकार केल्याने रागाच्या भरात साथीदार हर्षल जिजाबराव पाटील याच्या मदतीने डोक्यात दगड टाकून खून केल्याची कबूल केले आहे़ दोघांना अटक करण्यात आली आहे़
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस कर्मचारी रफिक पठाण, श्रीकांत पाटील, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मयूर पाटील, तुषार पारधी, गुलाब पाटील यांनी ही कारवाई केली आहे़