शिरपूर एस. टी. आगाराचे बांधकाम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST2021-07-28T04:37:25+5:302021-07-28T04:37:25+5:30
शिरपूर बसस्थानकातील वर्कशॉपचे नवीन बांधकाम गेल्या वर्षी सुरू झाले आहे. एस. टी. महामंडळाकडून एन. एम. सोनवणे कन्स्ट्रक्शन कंपनीला हे ...

शिरपूर एस. टी. आगाराचे बांधकाम संथगतीने
शिरपूर बसस्थानकातील वर्कशॉपचे नवीन बांधकाम गेल्या वर्षी सुरू झाले आहे. एस. टी. महामंडळाकडून एन. एम. सोनवणे कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. एका वर्षात एस. टी. बस स्थानकाचे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा होती. परंतु, नवीन बसस्थानकाचे काम झालेले नाही. यामुळे तालुक्यातील प्रवाशांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सोमवार दि. २६ जुलै रोजी शिरपूर बसस्थानकात जाऊन भेट दिली व कामाची पाहणी केली. या ठिकाणी एस. टी. वर्कशॉपच्या समोर मोठ्या जागेत गेल्या वर्षीपासून नवीन एस. टी. डेपो वर्कशॉपचे दोन मजली आर. सी. सी. काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर एस. टी. बस स्थानकाचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार काशिराम पावरा यांनी एस. टी. महामंडळाचे नाशिक येथील कार्यकारी अभियंता व धुळे येथील उपअभियंता यांच्याशी संपर्क साधून कामाबाबत विचारपूस करून संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मजुरांअभावी व निधीअभावी कामात अडथळे आल्याचे सांगितले. तसेच यावर्षीदेखील निधीअभावी नियमितपणे काम करण्यात अडचणी आल्याचे सांगितले. यावेळी आमदार काशिराम पावरा यांनी यावर्षी कोरोना काळात कोणतीही विकासकामे थांबवू नये अशा शासनाच्या स्पष्ट सूचना असल्याचे सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी महामंडळाकडून निधी मिळत नसल्याचे सांगितले.
एन. एम. सोनवणे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आतापर्यंत झालेल्या शिरपूर एस. टी. डेपो वर्कशॉपच्या दोन मजली कामात आतापर्यंत एकही रुपया निधी महामंडळाकडून मिळाला नसल्याचे सांगितले. कोरोनामुळे एस. टी. महामंडळाला आर्थिक फटका बसल्याने महामंडळाकडून निधी मिळत नसल्याचे समजते. हे सर्व ऐकल्यानंतर आमदार काशिराम पावरा यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना एस. टी. बस स्थानकाचे काम वेळेत पूर्ण करावे व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा स्पष्ट सूचना दिल्या.
संबंधित अधिकाऱ्यांनीदेखील लवकरच पाठपुरावा करून शिरपूरचे बसस्थानक प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी एस. टी. डेपो मॅनेजर वर्षा पावरा, वाहतूक नियंत्रक मनोज पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.