मार्च महिन्यात शिरपूर बनले हॅाटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:20+5:302021-03-18T04:36:20+5:30
शिरपूर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या एप्रिल महिन्यात आमोदे येथे आढळून आल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला़ एप्रिल ...

मार्च महिन्यात शिरपूर बनले हॅाटस्पॉट
शिरपूर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या एप्रिल महिन्यात आमोदे येथे आढळून आल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला़ एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान या तालुक्यात २ हजार ६९४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते़ त्यापैकी ६७ जणांना आपला जीव गमवावा लागला असून २ हजार ६१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ जानेवारी २०२१ मध्ये ४७ रुग्ण, फेब्रुवारीत ३५ तर १६ मार्च अखेर ४६८ असे एकूण या तीन महिन्यात ५५० कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत़ गत १६ दिवसात तब्बल ४९१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत़ दरम्यान, तब्बल ४ महिन्यानंतर शहरातील एकाचा बुधवारी नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूची संख्या ६८ पर्यंत पोहचली आहे़
मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने तोंड वर काढले आहे़ ३ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला तरी कोरोना बाधितांची संख्या घटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे़ कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ही धोक्याची सूचना आहे़ सध्या रुग्णसंख्या वाढताना दिसताच आरोग्य विभागाकडून चाचण्यांचेही प्रमाण वाढविण्यात आले आहे़ सोशल डिस्टन्सिंग, मास्क व हॅण्डवॉशचा वापर याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसताच जनता कर्फ्यू पाळण्यात आला़ परंतु तरीही नागरिक रस्त्यांवर गर्दी करताना दिसत होती़
शहरात ३ दिवसांचा जनता कर्फ्यू बुधवारी सकाळी संपताच बाजारपेठेत गर्दी उसळली होती़ कोरोनाचा वाढता संसर्ग गेला खड्ड्यात असे म्हणत जणू ही गर्दी झाली होती़ अनेकांनी मास्क अर्धवट लावलेले तर अनेकांना मास्कच नाहीत अशी परिस्थिती बाजारपेठेत होती़ गर्दी टाळा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असताना बाजारपेठाच नव्हे तर शासकीय कार्यालये व रस्त्यांवर नियमित गर्दी झाली होती़ अनेक जणांना कोरोना असताना लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे गर्दीतून अशा व्यक्तीमार्फत अधिक प्रमाणात कोरोना पसरण्याचा धोका अधिक असतो़ अनियंत्रित गर्दी कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे गंभीर चित्र गेल्या महिन्यापासून समोर आल्याने नाईलाजाने जनता कर्फ्यू लागू करावा लागला़
शहरातील काही बँकेतील अधिकारी व कर्मचारीदेखील कोरोना बाधित आढळून आल्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी बँकेचे कामकाज करताना त्रासदायक ठरत आहे़ शहरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापक बाधित आढळून आल्यामुळे त्या कॉलेजलादेखील काही दिवस सुट्या देण्यात आल्या होत्या़ प्राध्यापक-शिक्षकापाठोपाठ आता विद्यार्थीदेखील बाधित आढळून येत आहेत़
गेल्या वर्षभरापासून तालुका प्रशासन, महसूल विभाग, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, नगरपालिका विभागातील कर्मचारी नागरिकांच्या आरोग्यासाठी झटत आहेत़