शिंदखेड्यात कोरोनाबाधीतची चर्चा, भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:53 IST2020-04-03T21:52:10+5:302020-04-03T21:53:07+5:30
पोलिसांनी घेतले ताब्यात : तपासणीसाठी केले धुळ्याला रवाना, गावात चर्चेला उधाण

शिंदखेड्यात कोरोनाबाधीतची चर्चा, भीती
शिंदखेडा : शहरात कोरोना संशयीत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाल्याने तात्काळ पथकाने त्याच्या घरी धाव घेतली़ मात्र परिवाराचा प्रचंड विरोध झाल्यामुळे पुढील तपासणीसाठी धुळे रवाना करण्यासाठी प्रशासनाला खूप मेहनत घ्यावी लागली. या घटनेने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपासून शिंदखेडा शहरात संशयित असल्याची चर्चा होती. शिंदखेडा तहसिलदार साहेबराव सोनवणे यांना माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ भूषण मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ सुरेखा बोरडे यांच्याशी संपर्क करुन सदर घटनेची माहिती दिली़ तात्काळ सर्व अधिकारी, कर्मचारी हे संशयिताचा घरी दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी संशयिताला होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून मी गुजरातहुन आलो आहे, अशी माहिती दिली होती. मात्र दिलेली माहिती ही चुकीची असल्याचा संशय प्रशासनाला आहे. हिरे महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे़ मात्र, परिवाराने तीव्र विरोध केला असता पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पीएसआय सुशांत वळवी यांनी समज दिल्यानंतर पुढील तपासणीसाठी धुळ्यात पाठवण्यात आले. तर घरातील संशयित ६ सदस्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.