एसटीचा श्रावणात शिमगा, कर्मचाऱ्यांचे पगार लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST2021-08-19T04:39:33+5:302021-08-19T04:39:33+5:30
धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटीची सेवा सुरळीत होऊ लागली. मात्र उत्पन्नाअभावी कर्मचाऱ्यांचे पगार रखडू लागले आहेत. ऑगस्टचे तीन ...

एसटीचा श्रावणात शिमगा, कर्मचाऱ्यांचे पगार लटकले
धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटीची सेवा सुरळीत होऊ लागली. मात्र उत्पन्नाअभावी कर्मचाऱ्यांचे पगार रखडू लागले आहेत. ऑगस्टचे तीन आठवडे झाले तरी, कर्मचाऱ्यांना अद्याप जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक चणचण भासू लागल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
श्रावण महिन्यातच अनेक सण येत असतात. या सणांच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. श्रावण महिना असल्याने पगार वेळेवर होतील, अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र जुलै महिन्याचा पगार मिळणेही अवघड बनले आहे. पगारच नसल्याने उसनवारीने कर्मचाऱ्यांना पैसे घ्यावे लागत आहेत. कोरोनामुळे अजूनही प्रवासी प्रवास करण्याचे टाळत आहेत. त्याचा परिणाम उत्पन्नावर झालेला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत असल्याची कारणे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत.
प्रशासनाच्या नियोजनाअभावी जुलै महिन्याचा पगार रखडला आहे. पगार नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च, किराणा तसेच दैनंदिन गरजा भागविणे कठीण बनले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार नियमित झाला पाहिजे.
- दीपक पांडव,
कर्मचारी
पगारावरच महिन्याचे सर्व नियोजन अवलंबून असते. मात्र पगारच वेळेवर होत नसल्याने, आर्थिक नियोजन कोलमडते. ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी जुलैचा पगार झालेला नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालविताना कसरत करावी लागते.
- प्रमिला दीक्षित
कर्मचारी
उत्पन्न कमी, खर्च जास्त
कोरोना महामारीनंतर एसटीची सेवा सुरळीत सुरू झालेली असली तरी, पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी अजूनही येत नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पन्नावर हाेतो.
पावसाळी हंगाम हा कमी गर्दीचा असतो. यात शेड्युल कमी केले जातात. मात्र कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जादा शेड्युल सुरू केले आहेत. अनेक गाड्या रिकाम्या धावतात. त्यामुळे जे उत्पन्न मिळते, ते डिझेलवरच खर्च होते. त्यामुळे महामंडळानेही शेड्युलचे योग्यपद्धतीने नियोजन केले पाहिजे. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ ठेवून कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्यासाठी प्रयत्न करावेत.
गर्दीच्या मार्गावरच बसेस सोडाव्यात
एसटी महामंडळातर्फे एकाच मार्गावर एकापाठोपाठ अनेक गाड्या सोडण्यात येत असतात. त्यामुळे एका गाडीत आठ-दहा प्रवासी, दुसऱ्या गाडीत तेवढेच प्रवासी असतात. त्यामुळे दोन्ही गाड्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. गाड्या रिकाम्या धावतात. मात्र डिझेल तेवढेच लागते. त्यामुळे एक बस पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच दुसरी बस सोडल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. तसेच गर्दीच्या मार्गावरच सर्वाधिक बसेस सोडण्याची गरज आहे.