धुळ्यात सिनेअभिनेते शशी कपूर वडिलांसोबत आले होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:25 IST2017-12-04T22:23:22+5:302017-12-04T22:25:11+5:30
१९५४ मधील जुन्या आठवणी आजही झाल्या ताज्या

धुळ्यात सिनेअभिनेते शशी कपूर वडिलांसोबत आले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द सिने अभिनेते शशी कपूर यांनी आपले वडील पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत २५ डिसेंबर १९५४ मध्ये धुळ्याला भेट दिली होती. त्यांच्या जुन्या आठवणी आजही ताज्या असल्याचे साहित्यिक जगदीश देवपूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
अभिनेते शशी कपूर यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले़ ते ७९ वर्षाचे होते़ मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला़ शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली होती़
सिने सृष्टीतील सर्वात जुने कलावंत बॉलीवूडचे पितामह पृथ्वीराज कपूर यांची निर्मिती असलेले ‘पगला घोडा’ हे हिंदी नाटक त्यांनी बसविले होते़ राज्यभर त्या नाटकाचे प्रयोग त्यांनी आयोजित केले होते़ ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी हे प्रयोग नेले होते त्या-त्या ठिकाणी त्या प्रयोगाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता़ यात विशेष म्हणजे त्यांचे चिरंजीव शशी कपूर त्यांच्यासोबत होते़ धुळ्यात ते आले होते़ आताचे स्वस्तिक चित्रमंदिर पूर्वी विजयानंद थिएटर नावाने प्रसिध्द होते. तेथे ‘पगला घोडा’ या त्यांच्या नाटकाचा प्रयोग झाला. शशी कपूर सोबत असल्याने त्या बालकलाकाराने सर्वांचे लक्ष वेधले होते़ पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा म्हटल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे उपस्थितांच्या नजरा वेधल्या जात होत्या़ तसेच पृथ्वीराज कपूर आपल्या मुलासोबत धुळ्याचे कोतवाल यांच्याकडे थांबले होते़ अशा जुन्या आठवणी पुणेस्थित शैलजा मोगलाईकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या़