योग्य भाव मिळत नसल्याने काकडी फेकण्याची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:41+5:302021-07-16T04:25:41+5:30
जवळील निमगुळ येथील शेतकरी किशोर मोहन चव्हाण यांनी मे महिन्यात भरउन्हात मेहनत घेऊन आपल्या शेतात दोन एकर ...

योग्य भाव मिळत नसल्याने काकडी फेकण्याची नामुष्की
जवळील निमगुळ येथील शेतकरी किशोर मोहन चव्हाण यांनी मे महिन्यात भरउन्हात मेहनत घेऊन आपल्या शेतात दोन एकर क्षेत्र काकडी महागडे बियाणे आणून लागवड केली. वेळोवेळी रासायनिक खते व औषध फवारणी करत चांगले उत्पन्न घेण्यासाठी पती-पत्नी दोघांनी कसरत केली़ काकडी निघायला लागल्यावर तोडणी करून भाड्याने वाहन लावून नाशिक व इतर ठिकाणी दूरवर बाजार समितीत विकायला नेली असता गेल्या आठवड्यात अनेकदा इतका कमी भाव मिळाला की खर्च ही निघत नव्हता़ त्यामुळे आज काकडीस मजूर लावून शेताच्या बांधावर फेकून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली़ त्याला त्या अगोदर पंचवीस हजार रुपये त्यासाठी खर्च लागला होता़ आता काकडी फेकण्यासाठी पाच हजार रुपये मजूर लावण्याचासुद्धा खर्च येणार आहे़ वाया जाण्यापेक्षा बाकी गावात बऱ्याच लोकांना त्यांनी काकडी फुकट वाटली़ अर्थात शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, तरीही खचून न जाता तो शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतो़ आता आधीच त्यांनी दोन एकर क्षेत्रात पपई लावलेली आहे़ भविष्यात पपईलासुद्धा भाव मिळेल अशी अपेक्षा आहे, असे अनेकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे म्हणून सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत शेतकरी लोकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा निमगुळकरांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी आपल्या शेतात कष्ट करून पिकांची उत्पादने घेतो़ मात्र, मार्केटमध्ये त्याने पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्याने केलेल्या मेहनतीवर पाणी फिरून जाते़ ही बाब आता शासनाने गांभीर्याने घेऊन शेतीत उत्पादन केलेल्या मालाला योग्य हमीभाव देण्याची गरज व्यक्त होत आहे़